
मुंबई, 01 ऑक्टोबर (हिं.स.)। JSW सिमेंट लिमिटेड (“JSW Cement”) आणि तिची सूचीबद्ध उपकंपनी शिव सिमेंट लिमिटेड (“Shiva Cement”) यांच्या संचालक मंडळांनी व्यवस्थेअंतर्गत पुनर्रचनेच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये, इतर बाबींसह, शिव सिमेंटचे JSW सिमेंट मध्ये विलीनीकरण (“योजना”) प्रस्तावित आहे. या एकत्रीकरणामुळे एकच एकात्मिक सिमेंट प्लॅटफॉर्म निर्माण होईल आणि त्यातून कार्यात्मक, आर्थिक तसेच व्यवस्थापकीय समन्वयाचा लाभ मिळवता येईल.
प्रस्तावित विलीनीकरणामागील प्रमुख धोरणात्मक कारणे:
व्यावसायिक समन्वय: आर्थिक, व्यवस्थापकीय, तांत्रिक, वितरण, विपणन तसेच इतर संसाधनांचे एकत्रीकरण करून कार्यक्षमतेला चालना देणे.
कच्च्या मालाच्या खरेदीचे अनुकूलन: शिव सिमेंटच्या क्लिंकर प्रकल्पाच्या माध्यमातून बॅकवर्ड इंटिग्रेशन साध्य करून बाह्य खरेदीवरील अवलंबित्व कमी करणे आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता सुधारणे.
आर्थिक समन्वय: निधी उभारणीतील अधिक लवचिकता, वित्तपुरवठ्याचा कमी खर्च आणि आंतर-कंपनी खात्री, हमी यातील दरी दूर करणे.
भागधारकांसाठी मूल्यवृद्धी: सुधारित कार्यात्मक समन्वयातून भविष्यातील विस्तारक्षमता आणि कार्यक्षमता वाढवून भागधारकांसाठी आर्थिक मूल्य वाढणार आहे; तसेच शिव सिमेंटच्या सार्वजनिक भागधारकांना अधिक मोठ्या आणि अधिक तरल संस्थेमध्ये थेट भागधारकत्व मिळेल. तिचा संस्थात्मक गुंतवणूकदारांचा आधार अधिक वैविध्यपूर्ण असेल.
सुलभ संरचना: प्रशासकीय कामांची पुनरावृत्ती, अनुपालनविषयक आवश्यकता आणि एकत्रीकरणासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये घट.
या योजनेमुळे या प्रक्रियेत सहभागी कंपन्यांच्या आर्थिक विवरणपत्रांची आर्थिक रचना देखील योग्य आकारमानात आणली जाईल.
शिव सिमेंट मधील (JSW सिमेंट व्यतिरिक्त) इतर भागधारकांकडे असलेल्या 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रत्येकी 41 समभागांसाठी JSW सिमेंट कडून 10 रु. दर्शनी मूल्य असलेले 5 इक्विटी समभाग जारी केले जातील.
ही योजना स्टॉक एक्स्चेंजेस, सेबी, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT), ओडिशा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच लागू असलेल्या इतर वैधानिक आणि नियामक प्राधिकरणांकडून आवश्यक मंजुरी मिळणे आणि संबंधित कायद्यांनुसार आणि/किंवा माननीय NCLT च्या निर्देशानुसार संबंधित कंपन्यांच्या भागधारकांची आणि कर्जदारांची आवश्यक संमती मिळणे, यावर अवलंबून आहे. नियामक मंजुरी वेळेत मिळाल्यास हा व्यवहार 12-14 महिन्यांच्या आत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
JSW सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नारवेकर म्हणाले: “प्रस्तावित विलीनीकरण हे अधिक एकात्मिक आणि कार्यक्षम व्यवसाय निर्माण करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. यामुळे कार्यात्मक आणि आर्थिक समन्वयाचा लाभ मिळेल, बॅकवर्ड इंटिग्रेशन मजबूत होईल आणि आमची कॉर्पोरेट संरचना अधिक सुलभ होईल. विशेष म्हणजे, यामुळे शिव सिमेंटच्या पब्लिक भागधारकांना अधिक मोठ्या आणि अधिक तरल सूचीबद्ध संस्थेच्या विकासात थेट सहभागी होता येईल.”
व्यवहारासाठी स्वतंत्र सल्लागार:
जेएम फायनान्शियल लिमिटेड यांनी विशेष वित्तीय सल्लागार म्हणून काम केले.
प्राइस वॉटरहाऊस अँड कंपनी एलएलपी यांनी कर आणि नियामक सल्लागार म्हणून काम केले.
पीडब्ल्यूसी बिझनेस कन्सल्टिंग सर्व्हिसेस एलएलपी आणि बीडीओ व्हॅल्युएशन ॲडव्हायजरी एलएलपी यांनी JSW सिमेंट आणि शिव सिमेंट यांच्या संचालक मंडळांना समभाग विनिमय गुणोत्तराचा अहवाल देण्यासाठी स्वतंत्र नोंदणीकृत मूल्यनिर्धारक म्हणून काम केले.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि DAM कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड यांनी अनुक्रमे JSW सिमेंट आणि शिव सिमेंट यांच्या संचालक मंडळांना समभाग विनिमय गुणोत्तरासंदर्भात निष्पक्षता मत (fairness opinion) दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर