
चेन्नई, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। आपल्या चेन्नई प्लांटमधील उत्पादन क्षमता वाढवण्याची घोषणा सीएट लिमिटेडने (CEAT Limited) आज केली. पॅसेंजर कार आणि एसयूव्ही (SUV), व्यावसायिक वाहने आणि दुचाकींच्या टायर श्रेणींसाठी ही क्षमता वाढ केली जात आहे. या विस्तारामुळे भारत तसेच युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील ग्राहकांसाठी प्रगत आणि प्रीमियम दर्जाची उत्पादने तयार करण्याची या प्लांटची क्षमता अधिक बळकट होणार आहे.
या प्लांटमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या प्रमुख उत्पादनांपैकी एक म्हणजे '4SeasonDrive+'. युरोपीअन दर्जाची ऑल-सीझन टायरची वैशिष्ट्ये हे टायर भारतात उपलब्ध करून देतात; बदलत्या हवामानाचा विचार करून आणि विशेषतः ओल्या रस्त्यांवरील ग्रिपवर लक्ष केंद्रित करून याची रचना करण्यात आली आहे.
हा प्लांट क्रॉसड्राइव्ह आरटी (CrossDrive RT) चे देखील उत्पादन करतो, जो अमेरिकेतील रग्ड आणि ऑफ-रोड टायर बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेला सीएटचा रग्ड टेरेन टायर आहे. सामान्य रस्त्यावरील वापरासाठी आवश्यक असलेल्या बहुउपयोगीतेसोबत हे उत्पादन रग्ड टेरेन क्षमतेला जोडते आणि भारतीय ग्राहकांसाठी सीएटच्या प्रीमियम एसयूव्ही पर्यायांचा विस्तार करते.
सीएटने स्पोर्टड्राइव्ह एसयूव्ही झेडआर22 (SportDrive SUV ZR22) साठी देखील उत्पादन क्षमता विकसित केली आहे, ज्यामुळे भारतात 22-इंची टायरचे उत्पादन करणारी पहिली भारतीय टायर कंपनी ठरली आहे. मोठ्या रिम असलेल्या, अल्ट्रा प्रीमियम एसयूव्ही वापरासाठी डिझाइन केलेल्या या श्रेणीमध्ये सीएट CALM तंत्रज्ञान देखील आहे आणि ती भारतात विक्रीसाठी सादर केली जात आहे.
सीएट लिमिटेडचेव्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, अर्णब बॅनर्जी म्हणाले, चेन्नईतील प्रकल्प हा भारतातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील सीएटच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे वाढलेली क्षमता आम्हाला प्रवासी वाहने, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठी अधिक प्रगत उत्पादने तयार करण्यास सक्षम करते; तसेच, यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेसारख्या बाजारपेठांमधील ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणेही शक्य होते. भारतात विकसित आणि उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या जोरावर 'प्रीमियम' श्रेणीमध्ये स्पर्धा करण्याची आमची क्षमता ही गुंतवणूक अधिक बळकट करते.
प्रगत व्यावसायिक वाहन टायर क्षमता
युरोप, उत्तर अमेरिका आणि इतर प्रगत बाजारपेठांमधील व्यावसायिक वाहन ताफ्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सीएटने प्लांटच्या ट्रक आणि बस रेडियल (TBR) उत्पादन क्षमतेचा विस्तार केला आहे.
हा प्लांट आता सात प्रगत TBR आकारांचे उत्पादन करू शकतो, जे युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम TBR विभागांची पूर्तता करतील.
वाहन ताफ्याच्या गरजा आता केवळ टिकाऊपणा आणि मायलेजपुरत्या मर्यादित न राहता, त्यामध्ये इंधनाचा कमी वापर, सुधारित आरामदायी प्रवास, उत्तम हाताळणी आणि इलेक्ट्रिक गतिशीलतेसाठी सज्जता यांचा समावेश होत आहे.
विकसित करण्यात आलेले नवीन वाइड बेस टायर्स, प्रत्येक चाकावरील पारंपरिक दोन टायर्सच्या रचनेची जागा घेऊ शकतात; यामुळे वाहने हलकी होतात, इंधनाची कार्यक्षमता सुधारते आणि अधिक भार वाहून नेण्यासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होते. लो-प्रोफाइल आकाराचे हे टायर्स आधुनिक ट्रॅक्टर्स, प्रादेशिक मालवाहतूक, ट्रेलर आणि शहरी वितरण वाहनांच्या ताफ्यांसाठी (फ्लीट्स) तयार करण्यात आले आहेत, जिथे उत्तम स्थिरता, नियंत्रण आणि प्रवासातील आराम महत्त्वाचा असतो.
जड व्यावसायिक वाहनांसाठीच्या उत्पादनांच्या श्रेणीसोबतच, चेन्नई येथील प्रकल्पामध्ये CEAT च्या लाइट ट्रक स्टील रेडियल टायर्सच्या (15 इंच, 16 इंच आणि 17.5 इंच आकारांमधील) उत्पादन क्षमतेतही वाढ केली जात आहे. वाहन उत्पादकांकडून नवीन पिढीतील लाइट ट्रक्स आणि बसेस बाजारात आणल्या जात असल्याने, भारत आणि परदेशात अशा टायर्सचा वापर वाढता आहे.
सीएटच्या प्रीमियम दुचाकी टायर श्रेणीचा विस्तार
चेन्नई येथील प्रकल्प सीएटच्या प्रगत दुचाकी टायर तंत्रज्ञान आणि प्रीमियम परफॉर्मन्स श्रेणींमधील गुंतवणुकीलाही बळ देतो.
सीएटची अद्ययावत SportRad Racing Slick श्रेणी रेसिंगसाठी विकसित करण्यात आली असून, तज्ज्ञ रायडर्सनी आव्हानात्मक ट्रॅक परिस्थितीमध्ये तिची चाचणी केली आहे. रेसट्रॅकवर उत्कृष्ट पकड आणि कामगिरी देण्यासाठी या टायर्सची रचना करण्यात आली आहे.
कंपनीच्या प्रीमियम श्रेणीमध्ये SportRad ST चाही समावेश आहे; ही 'स्पोर्ट टूरिंग' श्रेणी 650cc पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकलींसाठी तयार करण्यात आली आहे. दीर्घ अंतराच्या आणि उच्च-क्षमतेच्या प्रवासासाठी (टूरिंगसाठी) हे टायर्स विकसित केले गेले असून, यात उच्च वेगातील स्थिरता आणि वळणांवर मिळणारी उत्तम पकड यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कांचीपुरममधील श्रीपेरुंबुदूर येथे स्थित, 163 एकरच्या चेन्नई प्लांटमध्ये त्याच्या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेत कनेक्टेड मशिनरी, रिअल-टाइम डेटा ॲनालिटिक्स आणि प्रगत ऑटोमेशनचा समावेश आहे. ही सुविधा म्हणजे सीएटचा दुसरा कारखाना असून, डब्ल्यूएचओकडून लाइटहाउस अशी उपाधी प्राप्त करणाऱ्या जगातील केवळ चार टायर कारखान्यांपैकी एक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर