जिबूतीहून येमेनकडे जाणारी बोट उलटली; १५ मुलांसह १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, ११६ जण बेपत्ता
जिबूती शहर , 11 ऑक्टोबर (हिं.स.)।पूर्व आफ्रिकेतील जिबूतीच्या किनाऱ्याजवळ ३०५ जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने १५ मुलांसह किमान १०९ स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (आयओएम) रविवारी ही माहिती दिली. या दुर्घटनेत ८० हून अ
जिबूतीहून येमेनकडे जाणारी बोट उलटली; १५ मुलांसह १०९ स्थलांतरितांचा मृत्यू, ११६ जण बेपत्ता


जिबूती शहर , 11 ऑक्टोबर (हिं.स.)।पूर्व आफ्रिकेतील जिबूतीच्या किनाऱ्याजवळ ३०५ जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने १५ मुलांसह किमान १०९ स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (आयओएम) रविवारी ही माहिती दिली. या दुर्घटनेत ८० हून अधिक जण बचावले असून, किमान ११६ जण अद्याप बेपत्ता आहेत. बचावलेल्या सर्व व्यक्ती इथिओपियाचे नागरिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयओएमच्या माहितीनुसार, जिबूतीहून येमेनकडे जाणारी ही बोट गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी सकाळी ओबोकच्या उत्तरेकडील गुहेरेजवळ उलटली. या दुर्घटनेत ५२ पुरुष, ४२ महिला आणि १५ मुलांचा मृत्यू झाला.आयओएमच्या ओबोक येथील स्थलांतरित सहाय्यता केंद्रात ६४ बचावलेल्यांना आरोग्यसेवा, मानसिक आधार, संरक्षण सेवा, तात्पुरता निवारा आणि अन्न पुरवले जात आहे. तसेच, त्यांची कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणण्यासाठीही मदत केली जात आहे.

जिबूतीमधील आयओएमचे मिशन प्रमुख अलेक्झांडर कोइसेक म्हणाले, “या दुर्घटनेत जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. या अपघातातून बचावलेल्या व्यक्तींबरोबरच आपल्या प्रियजनांना गमावलेल्या आणि आपल्या नातेवाइकांबाबत कोणतीही माहिती नसलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”ते पुढे म्हणाले, “स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आमची पथके घटनास्थळी आपत्कालीन मदत पुरवत आहेत. आर्थिक संधींच्या शोधात या स्थलांतर मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागतो, याची ही दुर्घटना गंभीरपणे जाणीव करून देते.”

दरम्यान, अद्याप बेपत्ता असलेल्या व्यक्तींबाबत चिंता वाढत असताना जिबूती प्रशासनाने शोध आणि बचावकार्य सुरू ठेवले आहे. स्थानिक प्रशासनाकडून बचावलेल्या व्यक्तींना वैद्यकीय मदत दिली जात असून, मृतांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्थाही केली जात आहे.

आयओएमच्या माहितीनुसार, १० सप्टेंबरपासून इथिओपियाहून जिबूतीकडे प्रवास करणाऱ्या २० हजारांहून अधिक लोकांच्या हालचालींची नोंद संस्थेने घेतली आहे. तसेच, २०२५ मध्ये येमेनच्या सागरी मार्गावर ९०० हून अधिक स्थलांतरितांचा मृत्यू झाला किंवा ते बेपत्ता झाले. हा सागरी मार्ग पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत १८ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande