सौदी अरेबियातील विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३०९ हून अधिक जखमी
रियाध, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियातील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून, ३०९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (सीएसीए) या वृत
सौदी अरेबियातील विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३०९ हून अधिक जखमी


रियाध, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियातील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असून, ३०९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (सीएसीए) या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मृतांमध्ये सौदी अरेबियातील चार नागरिकांचा समावेश आहे. इतर मृतांमध्ये बांगलादेशचे दोन नागरिक, तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सीरिया, पॅलेस्टाईन आणि सुदान या देशांतील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असून, विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून, ३०९ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो आणि जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही प्राधिकरणाने केली आहे. या हल्ल्यात मालमत्तेचेही नुकसान झाले असून, त्याचे मूल्यांकन केले जात आहे.

गेल्या आठवडाभरात किंग खालिद विमानतळावर झालेल्या अनेक हल्ल्यांपैकी हा एक हल्ला आहे. शेजारील येमेनमध्ये इराणसमर्थित हुती बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यापासून विमानतळाला लक्ष्य केले जात आहे. ६ आणि ७ ऑक्टोबर रोजीही विमानतळावर हल्ले झाले होते. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण जखमी झाले होते.

हल्ल्यानंतर विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, रियाधकडे जाणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात येत होती.

अलीकडील हल्ल्यांमध्ये तीन सौदी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. या हल्ल्यांचा विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. ‘फ्लाइटअवेअर’ या विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या संकेतस्थळानुसार, रियाध विमानतळावरील गेल्या २४ तासांत २२५ विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

फ्लायदुबई, लुफ्थांसा समूह आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्ससह अनेक विमान कंपन्यांनी सौदी अरेबियासाठीची विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. दरम्यान, अमेरिकेने आपल्या नागरिकांना विमानतळ आणि त्याच्या आसपासच्या परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

वृत्तानुसार, सौदी अरेबियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने रियाधला जाणाऱ्या आणि रियाधहून येणाऱ्या विमानफेऱ्या रद्द ठेवण्याचा कालावधी वाढवला आहे.एअर इंडिया एक्सप्रेसची विमानसेवा १४ ऑक्टोबरपर्यंत, तर एअर इंडियाची विमानसेवा १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द राहणार आहे. यापूर्वी दोन्ही विमान कंपन्यांनी १० ऑक्टोबरपर्यंत विमानफेऱ्या रद्द करण्याची घोषणा केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande