डीआरआयकडून ११.५० कोटींचे ७.८ किलो सोने जप्त; सहा जणांना अटक
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पूर्व भारतात बांगलादेशातून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीशी संबंधित नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने विशेष मोहीम राबवून ७.८ किलोपेक्षा अधिक परदेशी सोने जप्त केले आहे. या
DRI seizes smuggled gold


नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पूर्व भारतात बांगलादेशातून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीशी संबंधित नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने विशेष मोहीम राबवून ७.८ किलोपेक्षा अधिक परदेशी सोने जप्त केले आहे. या सोन्याची बाजारातील किंमत ११.५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, डीआरआयने पूर्व भारतात गुप्त माहितीच्या आधारे अनेक कारवाया करून सुमारे ७.८ किलो परदेशी सोने जप्त केले आहे. या सोन्याची किंमत ११.५० कोटी रुपयांहून अधिक आहे. या कारवाईदरम्यान बांगलादेशच्या सीमेशी संबंधित तस्करीचे मार्ग उघड झाले असून, तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या कथित प्रमुखासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, एका कारवाई दरम्यान डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालमधील डनकुनी टोल प्लाझा येथे चारचाकी वाहन अडवले. या वाहनातून चार जण प्रवास करत होते. ते बांगलादेश सीमेजवळील बनपूर शहरातून कोलकात्याकडे जात होते. वाहन आणि त्यातील प्रवाशांची झडती घेतली असता, अधिकाऱ्यांना सुमारे ६.८ किलो वजनाच्या सोन्याच्या ५० लगडी (गोल्ड बार) आढळल्या. त्यांची किंमत सुमारे १० कोटी रुपये होती. यापैकी काही सोन्याच्या लगडींवर परदेशी खुणा होत्या.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहनातील व्यक्तींना या मौल्यवान धातूच्या कायदेशीर मालकीसंबंधी कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. चौकशीदरम्यान आरोपींनी बांगलादेशमार्गे भारतात परदेशी सोन्याची तस्करी करण्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक जण बनपूर सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या तस्करी सिंडिकेटचा कथित प्रमुख होता, असे डीआरआयने स्पष्ट केले.

त्याच दिवशी करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवायांमध्ये डीआरआयच्या पथकांनी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन रेल्वे स्थानक आणि न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक येथे रेल्वे प्रवाशांना अडवले. झडतीदरम्यान सुमारे एक किलो परदेशी सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे १.५ कोटी रुपये आहे.

अर्थ मंत्रालयाने सांगितले की, डीआरआयच्या तपासात जप्त करण्यात आलेले सोने बांगड्या आणि सोन्याच्या लगडींच्या स्वरूपात होते. हे सोने त्रिपुरामधील भारत-बांगलादेश सीमेपलीकडून तस्करी करून आणलेल्या सोन्यापासून तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवायांमधून बांगलादेशला लागून असलेल्या सीमावर्ती भागांसह ईशान्य भारताला कोलकातासारख्या प्रमुख बाजारपेठांशी जोडणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गांचा वापर तस्करीच्या सोन्याची वाहतूक करण्यासाठी अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट होते. गुप्त माहितीच्या आधारे अंमलबजावणीची कारवाई आणि समन्वित मोहिमा राबवून संघटित तस्करी नेटवर्क नष्ट करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande