रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेले तीन भारतीय मायदेशी रवाना
नवी दिल्ली , 11 ऑक्टोबर (हिं.स.)।रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथील भारतीय दूतावासाने रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेल्या भारतीय नागरिकांबाबत माहिती दिली आहे. दूतावासाने सांगितले की, सोमवारी काळ्या समुद्रात तुर्कीच्या ‘एमव्ही रोयाद मम्मादोव’ या मालवा
रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेले तीन भारतीय मायदेशी रवाना


नवी दिल्ली , 11 ऑक्टोबर (हिं.स.)।रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथील भारतीय दूतावासाने रशियन ड्रोन हल्ल्यातून बचावलेल्या भारतीय नागरिकांबाबत माहिती दिली आहे. दूतावासाने सांगितले की, सोमवारी काळ्या समुद्रात तुर्कीच्या ‘एमव्ही रोयाद मम्मादोव’ या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बचावलेले तीन भारतीय नागरिक भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत.

दूतावासाने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन भारतीय नागरिक साहिल संधू, अश्विनी कुमार आणि हरमन सिंग हे शनिवारी भारतासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या मायदेशी परतण्याच्या प्रक्रियेत दूतावासाने आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य केले.या निवेदनात दूतावासाने रोमानियाचे अधिकारी, कॉन्स्टान्टा काउंटी रुग्णालय आणि रोमानियाच्या बचाव पथकांचे मोलाच्या मदतीबद्दल, सहकार्याबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले आहेत.

तुर्कीच्या एका कंपनीच्या मालकीचे हे जहाज युक्रेनमधील इझमेल बंदरातून इटलीतील रेव्हेना येथे मका घेऊन जात होते. सोमवारी रोमानियाच्या सागरी हद्दीबाहेर काळ्या समुद्रात या जहाजावर हल्ला झाला. या घटनेत दोन परदेशी खलाशांचा मृत्यू झाला, तर जहाजावरील अनेक कर्मचारी जखमी झाले. या हल्ल्यात तिन्ही भारतीय नागरिक बचावले. मात्र, त्यापैकी एक जण जखमी झाला होता. त्याच्यावर रोमानियामध्ये उपचार करण्यात आले. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे राष्ट्रीयत्व तातडीने समजू शकले नव्हते.

६ ऑक्टोबर रोजी काळ्या समुद्रात जहाजावरून बचावण्यात आलेल्या तिन्ही भारतीय नागरिकांची दूतावासाच्या प्रतिनिधीने ७ ऑक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यापैकी दोघांची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर तिसऱ्या व्यक्तीवर कॉन्स्टान्टा येथील काउंटी रुग्णालयात उपचार सुरू होते. दूतावासाने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये तिन्ही भारतीयांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. तसेच, जहाज कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीच्या माध्यमातून दूतावासाने त्यांना मोबाइल फोनसारख्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. याशिवाय, स्थानिक भारतीय उपाहारगृहाच्या मदतीने भारतीय जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande