राज्याच्या विकासातून देशाच्या विकासाचा मंत्र घेऊन मी नेहमीच पुढे चाललो - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। गेल्या २५ वर्षांपासून सरकारप्रमुख म्हणून काम करताना लोकशाहीच्या दोन शक्तींवरील आपला विश्वास सातत्याने अधिक दृढ झाला आहे. या दोन शक्ती म्हणजे देशातील जनता आणि सहकारी संघराज्यवाद, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविव
PM TAMILNADU ADDRESS METRO


नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। गेल्या २५ वर्षांपासून सरकारप्रमुख म्हणून काम करताना लोकशाहीच्या दोन शक्तींवरील आपला विश्वास सातत्याने अधिक दृढ झाला आहे. या दोन शक्ती म्हणजे देशातील जनता आणि सहकारी संघराज्यवाद, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. “मी नेहमीच राज्याच्या विकासातून देशाच्या विकासाचा मंत्र घेऊन पुढे चाललो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तमिळनाडूच्या दौऱ्यासाठी चेन्नई येथे पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम चेन्नई मेट्रोने पोरूर बायपास स्टेशन ते पूनामल्ली बायपास स्टेशन असा प्रवास केला आणि त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास केला. यानंतर त्यांनी जलकंडेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर आयआयटी मद्रास येथील मस्तिष्क केंद्राला भेट दिली. पंतप्रधानांनी १३ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, काही प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आपल्या सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत विज्ञानातील प्रगती आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पुढे जात आहे. आज त्यांनी तमिळनाडूमध्ये १३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे वाहतूक, उद्योग आणि व्यापाराला बळ मिळेल, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

पंतप्रधान म्हणाले की, वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी केवळ रस्ते रुंद करणे पुरेसे नाही, तर आधुनिक शहरांमध्ये सर्वांगीण पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. याच उद्देशाने गेल्या दशकभरात देशभरातील मेट्रो नेटवर्कचा विस्तार करण्यात आला आहे. २०१४ मध्ये देशातील केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध होती, तर आता २५ शहरांमध्ये मेट्रो धावत आहे.

मोदी म्हणाले की, तमिळनाडूसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असून, नव्या प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, तसेच राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

ते म्हणाले की, मंदिरांपासून मेट्रोपर्यंतचा तमिळनाडूचा अनुभव भारताच्या भावनेचे दर्शन घडवतो. भारत आपल्या सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत विज्ञानातील प्रगतीसह पुढे जात आहे. आधुनिक पायाभूत सुविधा नव्या संधी निर्माण करत आहेत. देशाचा वारसा आणि भविष्यातील आकांक्षा एकाच वेळी पुढे जात आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की, सागरी वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी देशातील बंदरांच्या पायाभूत सुविधाही मजबूत केल्या जात आहेत. केंद्र सरकार सुमारे १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून तूतीकोरीन येथील व्ही. ओ. चिदंबरनार बंदराचा जागतिक दर्जाचे मोठे कंटेनर आणि हरित ऊर्जा केंद्र म्हणून विकास करत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बंदरात जगातील अतिशय मोठ्या कंटेनर जहाजांची हाताळणी करणे शक्य होईल. यामुळे तमिळनाडूचा जागतिक उद्योग आणि वाहतूक केंद्र म्हणून विकास करण्यास मदत होईल.

ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच देशवासीयांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने सरकारप्रमुख म्हणून त्यांनी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ऑक्टोबर २००१ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. या २५ वर्षांत लोकशाहीच्या दोन शक्तींवरील, म्हणजेच देशातील जनता आणि सहकारी संघराज्यवादावरील आपला विश्वास सातत्याने अधिक दृढ झाला आहे. राज्याच्या विकासातून देशाचा विकास साधण्याचा मंत्र घेऊन आपण नेहमीच पुढे वाटचाल केली, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश आहे. २०१४ नंतर देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत ११ पट वाढ झाली आहे, तर संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५० पट वाढ झाली आहे. अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीतही नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. उत्पादन क्षेत्रातील या वाढीमुळे देशातील तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाखो रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीत तमिळनाडूच्या जनतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande