
रायगड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
कबड्डीच्या मैदानात पोयनाड पोलिसांनी आपली ताकद सिद्ध करत ‘सागरी सुरक्षा चषक २०२६’वर दुहेरी मोहोर उमटवली. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत पोयनाड पोलीस स्टेशनने स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. रायगडच्या सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेची १० ऑक्टोबर रोजी अलिबागच्या मुख्य समुद्रकिनारी उत्साहात सांगता झाली.
पुरुष गटात वडखळ पोलीस स्टेशनने द्वितीय, तर श्रीवर्धन पोलीस स्टेशनने तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात मांडवा पोलीस स्टेशनने द्वितीय, तर दिघी सागरी पोलीस स्टेशनने तृतीय स्थान पटकावले. विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मांडवा सागरी, रेवदंडा, मुरूड आणि दिघी सागरी या चार ठिकाणी साखळी पद्धतीने सामने झाले. त्यानंतर अंतिम फेरी अलिबाग येथे पार पडली. खेळाडूंच्या चुरशीच्या लढतींनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गायक शाहीर शिवडीकर आणि राजेश हार्डे यांनीही खेळाडूंचा उत्साह वाढविला.
ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा न ठरता पोलीस दल, सागरी सुरक्षा रक्षक आणि कोळी बांधवांमधील एकजूट व परस्पर विश्वास दृढ करणारा उपक्रम ठरली. कबड्डीच्या मैदानातून सागरी सुरक्षेचा संदेश देत रायगड पोलिसांनी सुरक्षित किनारपट्टीसाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)