
नवी दिल्ली , 11 ऑक्टोबर (हिं.स.) रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामन्यांच्या पहिल्या दिवशी रिंकू सिंग, रविचंद्रन स्मरण आणि यश राठोड यांची शतके, तसेच मोहम्मद शमी, मुशीर खान आणि रवींद्र जडेजा यांच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर भारताचे काही दिग्गज देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच काही उदयोन्मुख क्रिकेटपटू चमकले असले, तरी कसोटी संघातील नियमित क्रिकेटपटू केएल राहुल (४ धावा) आणि यशस्वी जैस्वाल (० धावा) यांना अनुक्रमे कर्नाटक आणि मुंबईसाठी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
- एलिट गट 'अ'
एलिट गट 'अ' मध्ये, बिहारने उत्तर प्रदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एका टप्प्यावर उत्तर प्रदेशची स्थिती ३ बाद ८५ अशी होती; मात्र माधव कौशिक (२५२ चेंडूत नाबाद १२४; ५ चौकार व ३ षटकार) आणि रिंकू (१६४ चेंडूत नाबाद १०९; ८ चौकार व ३ षटकार) यांच्या शतकी खेळींमुळे संघाची धावसंख्या ३ बाद २८७ पर्यंत पोहोचली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी द्विशतकी अभेद्य भागीदारी केली.
गट 'अ' मधील विदर्भ आणि पुद्दुचेरी यांच्यातील दुसऱ्या सामन्यात, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर विदर्भाची अवस्था ५ बाद ५४ अशी बिकट झाली होती. विजय राजा (२/४७) आणि गौरव यादव (२/६१) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे विदर्भाला सुरुवातीला हा धक्का बसला. तरीही, यश राठोड (१६७ चेंडूत नाबाद १३१; ११ चौकार व १ षटकार) आणि कर्णधार अक्षय वाडकर (२२५ चेंडूत नाबाद ११२; १३ चौकार) यांच्या शतकांमुळे, रणजी ट्रॉफी तीन वेळा जिंकणाऱ्या विदर्भ संघाने दिवसाच्या अखेरीस ५ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली.
गतविजेत्या जम्मू-काश्मीरसाठीही हा दिवस अतिशय चांगला ठरला. त्यांनी मध्य प्रदेशचा डाव अवघ्या १९६ धावांत गुंडाळला. मध्य प्रदेशचा डाव सावरण्याचे काम कर्णधार शुभम शर्माने (१७४ चेंडूत ७९ धावा, ८ चौकार) केले. रोहित शर्मा (५/३६) आणि सुनील कुमार (४/६९) यांनी सर्वाधिक बळी घेतले, तर आकिब नबीलाही एक विकेट मिळाली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू-काश्मीरची धावसंख्या १ बाद ३ अशी होती आणि कामरान इक्बाल व वंशज शर्मा नाबाद होते.
- एलिट गट 'ब'
गट 'ब' कडे मध्ये कर्नाटकसाठी के.एल. राहुलचे रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले, मात्र तो दुहेरी धावसंख्याही गाठू शकला नाही. कर्नाटकची अवस्था ४ बाद २२ अशी असताना, कर्णधार स्मरणने (२१८ चेंडूत १२६ धावा; ११ चौकार आणि १ षटकार) दबावाखाली शानदार खेळी केली; तसेच कृष्णन श्रीजितनेही अर्धशतक (८२ चेंडूत ५८ धावा; ३ चौकार आणि ३ षटकार) झळकावले. कर्नाटकचा डाव अवघ्या २७४ धावांत आटोपला आणि सौरभ कुमार (३/६९) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दिवसाच्या अखेरीस आंध्र प्रदेशची धावसंख्या २ बाद १६ अशी होती आणि ते २५८ धावांनी पिछाडीवर होते. सौराष्ट्रच्या संघातही रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले; त्याने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात सहभाग घेतला. प्रेरक मंकड (११२ चेंडूत नाबाद ९२ धावा; ११ चौकार आणि १ षटकार), चिराग जानी (१४८ चेंडूत ८३ धावा; १२ चौकार आणि २ षटकार) आणि जडेजा (१५४ चेंडूत नाबाद ७२ धावा; ५ चौकार) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर सौराष्ट्रने दिवसाच्या अखेरीस ४ बाद ३०८ धावांची मजल मारली.
-एलिट गट 'सी'
गट 'सी' मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३० धावांत ४ बळी घेतले; यामुळे दिल्लीचा डाव २४० धावांत आटोपला. दिल्लीच्या डावात ऋतिक शोकीन (९८ चेंडूंत ५६ धावा; ३ चौकार, २ षटकार), आयुष दोसेजा (९२ चेंडूंत ४५ धावा; ६ चौकार) आणि सार्थक रंजन (८० चेंडूंत ३३ धावा; ४ चौकार) यांनी उल्लेखनीय खेळी केल्या. बंगालसाठी आकाश दीपनेही (२/७४) बळी मिळवले. महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस यांच्यातील सामन्यात पृथ्वी (७३ चेंडूंत ७० धावा; ८ चौकार, १ षटकार) आणि अंकित बावणे (२३२ चेंडूंत नाबाद १०५ धावा; ११ चौकार, १ षटकार) यांनी शानदार फलंदाजी केली, ज्यामुळे दिवसाच्या अखेरीस महाराष्ट्राची धावसंख्या ५ बाद २८७ अशी होती.
-एलिट गट 'डी'
गट 'डी' मध्ये, चंदीगडविरुद्धच्या सामन्यात दिवसाच्या अखेरीस मुंबईने ५ बाद २४९ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना, यशस्वीला खातेही उघडता आले नाही (१३ चेंडूंत ० धावा). मात्र, कर्णधार सिद्धेश लाड (१७६ चेंडूंत नाबाद ८० धावा; ८ चौकार) आणि मुशीर खान (१४९ चेंडूंत ६५ धावा; ४ चौकार) यांची अर्धशतके, तसेच आयुष म्हात्रेची आक्रमक खेळी (८२ चेंडूंत ४८ धावा) यांच्या जोरावर ४२ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने दिवसाचा खेळ संपवला. यावेळी लाड आणि शम्स मुलाणी (नाबाद २७) मैदानावर नाबाद होते. चंदीगडसाठी रोहित धांडा (३/४४) हा प्रमुख बळी घेणारा गोलंदाज ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे