भारत 'अ' संघाची ऑस्ट्रेलिया 'अ' संघावर ४९ धावांनी मात
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)तिसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारत ''अ'' संघाने ऑस्ट्रेलिया ''अ'' संघाला ४९ धावांनी पराभूत केले. एकेकाळी सामन्यात टिकून असलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरला आणि २२६ धावांवर सर्वबाद झाला. यश
भारत 'अ' संघाची ऑस्ट्रेलिया 'अ' संघावर ४९ धावांनी मात


नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर (हिं.स.)तिसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात भारत 'अ' संघाने ऑस्ट्रेलिया 'अ' संघाला ४९ धावांनी पराभूत केले. एकेकाळी सामन्यात टिकून असलेला ऑस्ट्रेलिया संघ भारतीय गोलंदाजांसमोर अपयशी ठरला आणि २२६ धावांवर सर्वबाद झाला. यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग आणि निशांत सिंधू यांच्या प्रभावी गोलंदाजीने भारत 'अ' संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारत 'अ' संघाने ४७.३ षटकांत २७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलिया 'अ' संघ ४६.२ षटकांत केवळ २२६ धावाच करू शकला. भारताकडून गुर्जपनीत सिंगने तीन बळी घेतले, तर यश ठाकूर आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

मजबूत स्थितीत असूनही, ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचा डाव अचानक कोसळला. भारतीय गोलंदाजांनी दबाव टाकत झटपट बळी घेतले आणि प्रतिस्पर्धी संघाला २२६ धावांवर गुंडाळले. ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने आपल्या शेवटच्या सात विकेट्स केवळ ४९ धावांत गमावल्या. मिचेल ओवेन २० धावांवर गुर्जपनीत सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. विल सदरलँडने सात धावा आणि बेन ड्वार्शियसने पाच धावा केल्या. टॉड मर्फी सहा धावांवर यश ठाकूरच्या गोलंदाजीवर देवदत्त पडिक्कलकरवी झेलबाद झाला. गुर्जपनीत सिंगने ५६ धावांत तीन बळी घेतले. यश ठाकूर आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत 'अ' संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी १०.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. प्रभसिमरनने सहा चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. दरम्यान, प्रियांश आर्य अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर राहिला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या.

सूर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांनी सातव्या विकेटसाठी ७७ चेंडूंमध्ये ८५ धावांची भागीदारी करून इंडिया 'ए' संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. विपराजने ४४ चेंडूंमध्ये सहा चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. दुसरीकडे, सूर्यांशने शानदार फलंदाजी करत ६० चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. अनुकूल रॉय ११ चेंडूंमध्ये १३ धावा करून नाबाद राहिला. या भागीदारीमुळे इंडिया 'ए' संघ ४७.३ षटकांत २७५ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलिया 'अ' संघाकडून विल सदरलँड आणि बेन ड्वार्शियस यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर लियाम स्कॉटने दोन बळी घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande