नेपाळच्या गोरखा भागात भीषण पूर: ३५ हून अधिक घरे, अनेक पूल वाहून गेले, बचावकार्य सुरू
काठमांडू, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात रविवारी पहाटे निसर्गाचे अत्यंत भीषण रूप पाहायला मिळाले. बूढी गंडकी नदीला अचानक आलेल्या मलबामिश्रित प्रचंड पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे ३५ हून अधिक घर
नेपाळच्या गोरखा भागात भीषण पूर: ३५ हून अधिक घरे, अनेक पूल वाहून गेले, बचावकार्य सुरू


काठमांडू, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात रविवारी पहाटे निसर्गाचे अत्यंत भीषण रूप पाहायला मिळाले. बूढी गंडकी नदीला अचानक आलेल्या मलबामिश्रित प्रचंड पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे ३५ हून अधिक घरे तसेच अनेक पूल वाहून गेले आहेत.

चुमनुब्री ग्रामीण नगरपालिका-३ चे वॉर्ड अध्यक्ष रामकुमार गुरूंग यांच्या माहितीनुसार, बूढी गंडकी नदीला आलेल्या पुरामुळे सालेरी, पैयुका आणि जगत या नदीकाठच्या भागांतील अनेक घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. याशिवाय, वॉर्डला जोडणारा एक झुलता पूल तसेच न्याकचेत आणि फिलिम बाजार यांना जोडणारा पूलही वाहून गेला आहे.या अचानक आलेल्या आपत्तीबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, रविवारी पहाटे सुमारे चार वाजल्यापासूनच नदीच्या प्रवाहातून मोठ्या गडगडाटाचे आवाज ऐकू येऊ लागले होते. पाण्याचा प्रवाह वारंवार थांबत होता आणि त्यानंतर अचानक वेगाने पुढे येत होता. त्यामुळे नागरिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. अनेकांनी घरातील सामान बाहेर काढण्याची संधी न मिळाल्याने थेट घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

दरम्यान, गोरखा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा अधिकारी धर्मेंद्र कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अहवालात सिउरिबासच्या वरच्या भागात भूस्खलन झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, चुमनुब्री-६ मधील लोकपा आणि चुमलिंग यांच्यादरम्यान बूढी गंडकी नदीला मिळणाऱ्या स्यर या उपनदीचा प्रवाह अडवल्यामुळे अचानक पूर आल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सुदैवाने, आतापर्यंत या आपत्तीत कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरूंग यांनी सांगितले की, नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रभावित भागांत बचावकार्य राबवण्यासाठी, मदतसामग्री वितरित करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल (एपीएफ) आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी मदत व बचावकार्यात पूर्णपणे सहभागी झाले आहेत. तसेच, ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून नागरिकांना सतत सूचना दिल्या जात आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि तातडीने उंच व सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande