जम्मू-काश्मीर : मोहम्मद फैजानसह 4 दहशतवादी ठार
एलओसीवरील पुंछ सेक्टरमध्ये उधळला घुसखोरीचा प्रयत्न पुंछ, 12 ऑक्टोबर (हिं.स.) । जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा सुरुंग स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आह
संग्रहित फोटो


एलओसीवरील पुंछ सेक्टरमध्ये उधळला घुसखोरीचा प्रयत्न

पुंछ, 12 ऑक्टोबर (हिं.स.) । जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा सुरुंग स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद फैजान याचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कृष्णा घाटी सेक्टरमधील सतवाल-नाकी परिसरात सोमवारी ही घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ते घुसखोरी रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या भूसुरुंगांच्या क्षेत्रात पोहोचले. त्यानंतर झालेल्या स्फोटात चारही दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेत मोहम्मद फैजान याच्यासह मोहम्मद इश्तियाक, वकास आणि असीम या 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेचा परिसर भौगोलिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. या भागातून होणारी संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांकडून सातत्याने निगराणी ठेवली जाते. या घटनेनंतर संबंधित परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आल्याचे वृत्त आहे.सीमावर्ती भागात दहशतवादी घुसखोरी रोखणे हे सुरक्षा दलांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. सतवाल-नाकी परिसरातील या घटनेमुळे नियंत्रण रेषेवरील कडक निगराणी आणि घुसखोरीविरोधी उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande