आम्ही आमच्या देशात आमच्याच अधिकारांसाठी लढत आहोत - आदित्य ठाकरे
ठाकरे गटाचे मूक आंदोलन, मनसेची स्वाक्षरी मोहीम मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) - आम्ही आज मूक मोर्चा आयोजित केला, कारण देश जेव्हा शांत होतो आणि तेव्हा एकाच व्यक्तीची मन की बात ऐकावी लागते. तेव्हा कशी शांतता होते आणि लोक किती गुदमरतात हे आपल्याला बघाय
आदित्य ठाकरे मोर्चा


मनसे स्वाक्षरी मोहीम


- ठाकरे गटाचे मूक आंदोलन, मनसेची स्वाक्षरी मोहीम

मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) - आम्ही आज मूक मोर्चा आयोजित केला, कारण देश जेव्हा शांत होतो आणि तेव्हा एकाच व्यक्तीची मन की बात ऐकावी लागते. तेव्हा कशी शांतता होते आणि लोक किती गुदमरतात हे आपल्याला बघायला मिळतं. काल-परवा जी गळचेपी झाली होती, ती आज झालेली नाही. आम्ही खूप वेळा मुंबई पोलिसांचं कौतुक करत असतो, पण काल आणि परवा त्यांचं जे भयानक रूप दिसलं, तेव्हा असं वाटायला लागलं होतं की, दिल्लीकडून आदेश येत आहेत की काय? त्यामुळे आज आम्ही परत एकदा सांगितलं की, दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंत आम्हाला निदर्शनं करू द्या. आम्ही आमच्या देशात आमच्याच अधिकारांसाठी लढत आहोत, मतचोरीच्या विरोधात लढत आहोत. त्यामुळे ही आंदोलने संपूर्ण देशात सगळीकडे सुरू राहणार आहेत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जे निर्लज्ज आहेत, ते राजीनामा देणार नाहीत. फौजफाटा वापरून ज्ञानेश कुमार यांचा वाचवलं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवलं नाही, मात्र ज्ञानेश कुमार यांना वाचवलं जात आहे. कारण हे सरकार मतचोरी चोरीने बनलं आहे. यासाठीच दिल्लीत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. सगळे देशभक्त रस्त्यावर उतरले आहेत आणि न्याय मागत आहेत. ते मतचोरीच्या विरोधात लढत आहेत. देशद्रोही, गद्दार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावरून रविवारी मुंबईत राजकीय घडामोडी दिसून आल्या. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे धरपकड सुरू केली होती. त्याचा दुसरा अंक आज, सोमवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी आज एकजुटीने रस्त्यावर उतरू या! तोंडावर काळी फीत, हातात तिरंगा आणि मनात लोकशाही वाचवण्याचा निर्धार कररुया. यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क परीसरातील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंत मूक आंदोलनाची हाक देण्यात आली होती. तर मनसेकडून सकाळी दादर स्टेशनबाहेर आणि संध्याकाळी शिवाजी पार्क परिसरात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार अनिल परब, आमदार महेश सावंत, आमदार विलास पोतनीस, नेते नितीन देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर राज ठाकरे यांच्या संपूर्ण परीवाराने स्वाक्षरी मोहीमेत सहभागी नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande