
सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवरून काँग्रेसवर निशाणा
नागपूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.) : निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलीय. संविधान हातात घेऊन देशातील संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.
पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूरच्या कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात आयोजित बैठकीपूर्वी फडणवीस म्हणाले की, काँग्रेसकडून निवडणूक आयोग, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांसारख्या संस्थांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या संस्था जनतेला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना त्यांनी या पक्षावर संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना नाकारण्याचा आरोप केला. मात्र, हे सर्व आरोप फडणवीस यांनी राजकीय टीकेच्या स्वरूपात केले आहेत.मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेवर फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारावे किंवा आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करणे घटनात्मक व्यवस्थेशी सुसंगत आहे का, असा सवाल त्यांनी केला.
‘सेपरेशन ऑफ पॉवर्स’ अर्थात सत्ताविभाजनाच्या तत्त्वानुसार न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे काम करते. न्यायालयाचे काम याचिकांवर सुनावणी करून कायद्यानुसार निर्णय देणे आहे. त्यामुळे न्यायालयावर मोर्चाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आंदोलनकर्त्यांना भेटण्याऐवजी याचिका दाखल केल्यास त्यावर सुनावणी घेण्याची भूमिका मांडल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. सोशल मीडियावर सरन्यायाधीशांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
न्यायसंस्थेबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाल्यास लोकशाही संस्थांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. संविधानाचे समर्थन करणाऱ्यांनी न्यायालयाच्या स्वायत्ततेचाही आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.
आणीबाणीचा दाखला देत काँग्रेसवर निशाणा
आणीबाणीचा संदर्भ देत फडणवीस यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारवरही टीका केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांवर निर्बंध आणण्यात आले आणि न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकारावरही परिणाम झाला, असे त्यांनी नमूद केले.त्या काळातील घटनांचा उल्लेख करत काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या फडणवीस यांनी, संविधानाचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष केल्याचा दावा केला. ‘संविधानाची प्रत हातात घेऊन कितीही आंदोलने केली, तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला हात लावू देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.
सोशल मीडिया पोस्ट आणि परदेशी निधीचा मुद्दा
जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट प्रसारित झाल्याचा उल्लेख करत फडणवीस यांनी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींना संसदीय समितीसमोर बोलावण्यात आल्याचे सांगितले. काही पोस्टचा प्रसार वाढवण्यासाठी पैसे दिले जात असल्याची माहिती प्रतिनिधींनी दिल्याचा दावा त्यांनी केला.हा पैसा परदेशातून आलेला असू शकतो, असेही त्यांनी सांगितल्याचे नमूद केले. तथापि, या दाव्याची व्याप्ती, संबंधित प्लॅटफॉर्मची नावे आणि निधीच्या स्रोताबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.
काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह
सततच्या निवडणूक पराभवांमुळे काँग्रेस अस्वस्थ झाली असून, भविष्यात सत्तेत येण्याची शक्यता कमी झाल्याने पक्षाकडून विविध मुद्द्यांवर आंदोलन केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची राजकीय ताकद कमी झाल्याचा दावा करत त्यांनी विविध राज्यांतील राजकीय परिस्थितीचा उल्लेख केला.काँग्रेस अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली. सत्तेत परतण्यासाठी पक्षाकडून कोणत्याही मार्गाचा अवलंब केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी