युद्धनौका आयएनएस ‘मांग्रोल’ भारतीय नौदलात दाखल
बंदर, सागरी किनारपट्टी आणि सागरी मार्गांच्या सुरक्षेत होणार वाढ; मोठ्या नौदल ताफ्याच्या मोहिमांनाही मिळणार मदत नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे निर्मित तिसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ‘मा
INS MANGROL COMMISSIONED INDIAN NAVY


INS MANGROL COMMISSIONED INDIAN NAVY


बंदर, सागरी किनारपट्टी आणि सागरी मार्गांच्या सुरक्षेत होणार वाढ; मोठ्या नौदल ताफ्याच्या मोहिमांनाही मिळणार मदत

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे निर्मित तिसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ‘मांग्रोल’ सोमवारी अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या सागरी ताफ्यात दाखल झाले. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित इंडक्शन समारंभात या युद्धनौकेचा नौदलात समावेश करण्यात आला. यामुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक मजबूत होणार आहे.

किनारपट्टीलगतच्या उथळ पाण्यात मोठ्या युद्धनौकांना कार्यरत राहण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत ‘मांग्रोल’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या युद्धनौकेच्या समावेशामुळे बंदरे, हार्बर आणि किनारी सागरी मार्गांच्या सुरक्षेसोबतच मोठ्या नौदल ताफ्याच्या मोहिमांनाही मदत मिळणार आहे.

मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल संजय वात्स्यायन होते. या कार्यक्रमाला नौदल आणि संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्रालय व कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी तसेच स्वदेशी शस्त्रे आणि सेन्सर तयार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील किनारी शहर आणि प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या मांग्रोलच्या नावावरून या युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. ही युद्धनौका पूर्वीच्या आयएनएस मांग्रोल (एम-८५) या युद्धनौकेचा वारसा पुढे चालवणार आहे. जुन्या युद्धनौकांचा वारसा जतन करण्याची परंपरा नौदलाने यानिमित्ताने कायम ठेवली आहे. पूर्वीच्या या युद्धनौकेने ७ एप्रिल २००४ पर्यंत भारतीय नौदलाची सेवा केली होती.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करून तयार करण्यात आलेली ‘मांग्रोल’ ही युद्धनौका युद्धनौका रचना, बांधणी तसेच प्रगत शस्त्रे आणि सेन्सर यांचे एकत्रीकरण करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली ही युद्धनौका संरक्षण क्षेत्रातील जहाजबांधणीमध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. किनारी भागातील आणि उथळ पाण्यातील पाण्याखालील धोक्यांचा शोध घेऊन त्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘मांग्रोल’ची रचना करण्यात आली आहे. ही युद्धनौका आधुनिक शस्त्रे आणि सेन्सरने सुसज्ज आहे. त्यामध्ये अभय हल-माउंटेड सोनार, हलके टॉर्पेडो, स्वदेशी अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर आणि मारीच अॅडव्हान्स्ड टॉर्पेडो डिकॉय सिस्टीमचा समावेश आहे.

कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या माहितीनुसार, आयएनएस मांग्रोलमध्ये प्रगत सोनार, टॉर्पेडो आणि एएसडब्ल्यू रॉकेट बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने किनारी भागातील पाण्यात पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा मुकाबला करता येईल. वॉटर जेट प्रोपल्शन प्रणाली असलेल्या तीन डिझेल इंजिनच्या साहाय्याने ही युद्धनौका कार्यरत राहते. त्यामुळे उथळ पाण्यातही तिला अत्यंत चांगल्या प्रकारे हालचाली करता येतात. पाण्याखालील देखरेख, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि माइन वॉरफेअरशी संबंधित कामे करण्याची क्षमताही या युद्धनौकेत आहे.

पाणबुड्यांपासून निर्माण होणारे धोके शोधण्यासाठी आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी ही युद्धनौका सागरी गस्त विमाने, हेलिकॉप्टर आणि अन्य युद्धनौकांसोबत समन्वयाने काम करू शकते. बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीत पाण्याखालील धोके वाढत असताना ‘मांग्रोल’चा नौदलात समावेश होणे हा भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेला बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande