

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत आयोजित एका समारंभात, भारतीय लष्कराने नवी दिल्ली येथे संरक्षण दलांसाठी ‘भारत राईस’ ची सुरुवात केली.
या कार्यक्रमादरम्यान भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्यात युद्धजन्य परिस्थितीत पायाभूत सुविधांचा वापर करण्यासंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उच्च दर्जाच्या तांदळाचे वितरण भारतीय अन्न महामंडळांच्या स्थानिक सुविधा केंद्रांऐवजी थेट लष्कराच्या पुरवठा आगारांमध्ये केले जाईल यामध्ये लडाख आणि ईशान्येकडील दुर्गम भागांचाही समावेश आहे
भारत राईस हा विश्वासाचा बंध असून त्याची सुरुवात शेतकऱ्यांच्या शेतात होते आणि तो थेट सैनिकांच्या ताटापर्यंत पोहोचतो. या उपक्रमाने जय जवान जय किसान या भावनेला प्रत्यक्ष साकारले असून त्यातून एक सामायिक निर्धार व्यक्त होत आहे आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचे रुपांतर सैनिकांच्या बळात होत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळी म्हणाले.
सैनिकांची युद्धसज्जता केवळ शस्त्रास्त्रांवर अवलंबून नसते; तर ती त्यांच्या शारीरिक आरोग्यावर, मानसिक समतोलावर, मनोधैर्यावर आणि सहनशक्तीवरही अवलंबून असते,विशेषतः जेव्हा ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात, तेव्हा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे त्यांनी सांगितले.
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारत राईस उपक्रमाचे कौतुक केले. आपले अनन्यसाधारण साहस आणि निष्ठेने देशाचे रक्षण करणाऱ्यांना अत्यंत उच्च प्रतीच्या तांदळाचे वितरण करायला मिळणे ही आपल्या विभागासाठी अभिमानस्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्यांना दर्जेदार अन्न पुरवणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे,असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule