
मुंबई, १२ ऑक्टोबर (हिं.स.) । तुषार देशपांडेने रणजी ट्रॉफीमध्ये हॅट-ट्रिक घेऊन इतिहास रचला. त्याने चंदीगडविरुद्ध ही कामगिरी केली. या वेगवान गोलंदाजाने अवघ्या सात षटकांत पाच बळी घेत मुंबईला या सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चंदीगडचा पहिला डाव ७८ धावांवर आटोपला. यामध्ये निशंक बिर्लाने सर्वाधिक ३३ धावा केल्या.
तुषारने आपली हॅट-ट्रिक पूर्ण करताना अर्जुन आझाद, शिवम भांब्री आणि दीपेंद्र कुश यांना बाद केले. अर्जुन आझादने ३३ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. त्यानंतर तुषारने त्याला बाद केले, पण शिवम भांब्री आणि दीपेंद्र कुश पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले.
तुषार देशपांडेने सामन्यात शानदार सुरुवात केली. त्याने प्रथम अर्स्लान खानला बाद करून संघाला पहिली विकेट मिळवून दिली, त्यानंतर अर्जुन आझादला बाद केले. त्याने पुढच्या दोन चेंडूंवर शिव भांब्री आणि दीपेंद्र कुश यांची विकेट घेऊन आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर त्याने पुढच्याच षटकात राज बावाला बाद केले आणि एका निर्धाव षटकासह ७ षटकांत १७ धावांत ५ बळी अशी कामगिरी केली.
चंदीगडच्या डावातील ११वे षटक टाकण्यासाठी तुषार देशपांडे गोलंदाजीला आला. चंदीगडचा कर्णधार मनन वोहरा पहिल्या चेंडूवर एकही धाव काढू शकला नाही. त्याने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर अर्जुन आझाद सिल्वेस्टर डिसोझाकरवी झेलबाद झाला. अर्जुन ३३ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह २० धावा करून बाद झाला. तुषारने षटकाच्या चौथ्या चेंडूवर शिवम भांब्रीला त्रिफळाचीत केले. शिवम आपले खाते उघडण्यात अपयशी ठरला आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर तुषारने दीपेंद्र कुशला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. तोही पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याने आपली हॅट-ट्रिक पूर्ण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे