
मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। विद्या बालनच्या सुपरहिट ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सिक्वेल तयार होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्या एकता कपूर यांनी ‘द डर्टी पिक्चर २’ बनवण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या या सिक्वेलचा विचार करत होत्या; मात्र कथेवर समाधान झाल्यानंतरच पुढे जाण्याची त्यांची इच्छा होती.
एका मुलाखती दरम्यान एकता कपूर यांनी सांगितले की, त्या बऱ्याच काळापासून चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची योजना आखत होत्या. आता त्यांच्याकडे अशी कथा आहे, जी प्रेक्षकांसमोर आणली पाहिजे, असे त्यांना वाटते. हा चित्रपट आपल्या प्रमुख चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगत त्यांनी जवळपास १५ वर्षांनंतर या चित्रपटाची निर्मिती करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सिक्वेलची कथा आणि त्यातील पात्रांबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.
‘द डर्टी पिक्चर’मध्ये विद्या बालनने दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिता यांच्या जीवनापासून प्रेरित पात्र साकारले होते. या चित्रपटात इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांनीही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. सिक्वेलमध्ये कोणते कलाकार दिसणार, त्याचे दिग्दर्शन कोण करणार आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र, यावेळी कथा एखाद्या एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित असेल, असे संकेत एकता कपूर यांनी दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule