अभिजीत जोंधळे यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा 'वाचन प्रेरणा सन्मान–२०२६' जाहीर
बीड, 13 ऑक्टोबर, (हिं.स.)। समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी अविरत धडपडणारे अंबाजोगाई येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत अरविंदराव जोंधळे यांना महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयातर्फे मान
अभिजित जोंधळे


बीड, 13 ऑक्टोबर, (हिं.स.)। समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी अविरत धडपडणारे अंबाजोगाई येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत अरविंदराव जोंधळे यांना महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयातर्फे मानाचा 'वाचन प्रेरणा सन्मान २०२६' जाहीर झाला आहे. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मुंबईत होणाऱ्या एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या घोषणेमुळे अंबाजोगाईच्या साहित्यिक आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग आणि शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील चर्चगेट येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दैनंदिन कार्य आणि व्यवसाय सांभाळून तळागाळात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जोंधळे यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची शासनाने योग्य दखल घेतली असून, मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

*वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान*

अभिजीत जोंधळे हे अनुराग पुस्तकालयचे संचालक असून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुस्तक वाचक चळवळ, पुस्तक पेटी योजना आणि पुस्तक कट्टा यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. ते स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय स्थानिक विकास समितीचे सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (बीड केंद्र) चे कोषाध्यक्ष, 'शब्दोत्सव' दिवाळी अंकाचे संपादक आणि मैत्री ग्रुप शिष्यवृत्ती समितीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. याशिवाय, अंबाजोगाई येथे बाल कुमार साहित्य संमेलन आणि ताई महोत्सव व्याख्यानमालेचे यशस्वी संयोजनही त्यांनी केले आहे.

*आजवरच्या कार्याची राज्यभरातून दखल*

महाराष्ट्रातील विविध व्याख्यानमालांमधून जोंधळे यांनी अनेक सामाजिक आणि प्रबोधनात्मक विषयांची प्रभावी मांडणी केली आहे. त्यांच्या या निरलस कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील प्रेम छात्र पुरस्कार व ग्रंथसखा पुरस्कार, अहमदनगरचा आर्यनंदी सामाजिक सेवा पुरस्कार आणि जळगावचा दीपस्तंभ राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आता राज्य शासनाचा अधिकृत वाचन प्रेरणा सन्मान मिळाल्याने त्यांच्या कार्याला एक मोठी आणि प्रतिष्ठेची पावती मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande