
अकोला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। सेवा संकल्प अभियानात गावोगाव उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागातर्फे ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे, समाजकल्याण विभागातर्फे कौशल्य विकास व नवोपक्रम, महसूल विभागातर्फे लोकअदालती व जिल्हा परिषदेतर्फे शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन होत आहे.
महसूल विभागातर्फे तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावात सेवा संकल्प अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात विविध नागरिकांना दाखल्यांचे वितरण, लाभ वितरण आदी कार्यक्रम झाले. महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेतर्फे नवे तापडियानगर येथे आरोग्य तपासणी शिबिर झाले. त्यात शंभरहून अधिक व्यक्तींची तपासणी झाली. आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समाजकल्याण कार्यालयातर्फे अकोला येथे नाविन्यपूर्ण संकल्पना व नवोपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक तसेच ग्रामीण नवोन्मेषक यांच्यामध्ये नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देऊन स्थानिक समस्यांवर प्रभावी, व्यवहार्य व शाश्वत उपाय शोधण्यावर भर देण्यात आला. स्वयंरोजगार, उद्योजकता व कौशल्य विकासाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन समता दुत मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून करण्यातआले.
मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील जि. प. शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सुंदर व आकर्षक रांगोळ्या तसेच विविध विषयांवरील चित्रे साकारली.
या स्पर्धांचे परीक्षण प्राथमिक उपआरोग्य केंद्र कंझरा येथील डॉ. सज्जाद यांनी केले. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली व त्यांच्यातील कलागुण विकसित होण्यास मदत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे