
लातूर, 13 ऑक्टोबर, (हिं.स.)। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ औसा येथे पदवीधर मतदार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत आमदार अभिमन्यू पवार यांनी पदवीधरांचे प्रश्न, अपेक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी सतीश चव्हाण यांच्या अनुभवाला व कार्याला भक्कम पाठबळ देऊन त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन केले.
या सभेला शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार दिनकरराव माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, औसाचे प्रभारी नगराध्यक्ष अफसर शेख, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गंगाधर आरडले, माजी सभापती योगीराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य संदिपान शेळके, दत्तात्रेय कोळपे, शिवरुद्र मुर्गे, बसवराज धाराशिवे, भागवत खंडापुरे, सूर्यकांत साळुंके, दिनकर निकम, संतोष आनंदगावकर, रमेश बेळंबे आणि निलेश माने यांच्यासह औसा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
**आमदार अभिमन्यू पवार यांचे आवाहन
पदवीधरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आणि भविष्यातील संधी निर्माण करण्यासाठी सतीश चव्हाण यांचा अनुभव व कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगत आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत द्या - आमदार विक्रम काळे
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सर्व पदवीधर मतदारांना महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी सतीश चव्हाण यांनी केलेले काम कौतुकास्पद असून, ते सर्वांना मदत करणारे आणि आपल्या भागातील हक्काचे नेतृत्व असल्याचे काळे म्हणाले. अनेक पदवीधरांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी चव्हाण यांनी प्रयत्न केले आहेत. महायुती भक्कम असून पदवीधर मतदारांनी आपले अमूल्य मत वाया न घालवता सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लातूर जिल्ह्यातून सतीश चव्हाण यांना मोठी आघाडी मिळेल, असा विश्वासही आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis