
नाशिक, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा अवघ्या 17 दिवसांवर आला असला, तरीदेखील अद्याप रामकुंडावरील विकास कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे टीकेचे धनी ठरत असलेल्या मनपा प्रशासन आणि कुंभ प्राधिकरणाने संथगतीने सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी रामकुंड परिसर बंद ठेवून कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
येत्या 31 ऑक्टोबरला रामकुंड परिसरात ध्वजारोहण सोहळा होणार आहे. एकीकडे ध्वजारोहण सोहळ्याचे नियोजन सुरु असताना रामकुंडावर सुरू असलेल्या कामांची गती संथ असल्याचे चित्र दिसून येत आहे. रामकुंड परिसरासह गोदावरी नदीच्या घाटांवर स्वच्छता, काँक्रीटीकरण, सुशोभीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. गांधी तलाव परिसरातील स्वच्छतेचे कामही हाती घेण्यात आले आहे. बांधकामांमुळे साचलेला मलबा आणि अनावश्यक साहित्य हटविण्याचे काम सुरू असले तरी कामाची गती संथ आहे. त्यामुळे रामकुंड परिसर हा भाविकांसाठी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्वविक्रमी शंखनाद 25 ऑक्टोबरला
ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम होतील. यात 25 ऑक्टोबर 2026 रोजी शंखनाद होईल. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येईल. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कॉफीटेबल बुकचे प्रकाशन, सायंकाळी गोदावरी नदीची आरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
शैव-वैष्णव आखाडे येणार एकत्र
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शैव आणि वैष्णव आखाडे एकत्र येणार आहेत. यानिमित्त गोदाघाटावर संयुक्त महाआरतीचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून यामाध्यमातून साधू-संतांमधील एकात्मता आणि समन्वयाचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI