
अनेक शहरांतील विमानसेवा 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगित
रियाध, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : सौदी अरेबियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रियाध येथील भारतीय दूतावासाने मंगळवारी भारतीय नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली. काही भारतीय विमान कंपन्यांनी सौदी अरेबियातील प्रमुख शहरांसाठीची विमानसेवा 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.
भारतीय दूतावासाने नागरिकांना शांत राहण्याचा आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. हवाई हल्ल्यांची परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने घराच्या किंवा इमारतीच्या आत राहावे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत माध्यमांतून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.याशिवाय, सध्या सुरू असलेल्या घटनांशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे किंवा बातम्या पडताळणी न करता प्रसारित अथवा पुन्हा शेअर करू नयेत, असे आवाहनही भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे.
अनेक शहरांसाठी विमानसेवा स्थगित
दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांनी १७ ऑक्टोबरपर्यंत रियाध, दम्माम आणि जेद्दा या शहरांसाठीची उड्डाणे स्थगित केली आहेत.अकासा एअरने रियाध आणि जेद्दासाठीची विमानसेवा स्थगित केली आहे. तर इंडिगोने रियाध, दम्माम, जेद्दा आणि मदिना या शहरांसाठीची उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत.या निर्णयांमुळे सौदी अरेबियात प्रवास करणाऱ्या तसेच भारतात परतण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन बदलावे लागू शकते.
रियाध विमानतळाचे कामकाज स्थगित
सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (जीएसीए) रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज स्थगित केल्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे.दरम्यान, दम्माम, जेद्दा आणि मदिना यांसारख्या अन्य प्रमुख शहरांतील विमानतळांचे कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या विमानतळांवरून होणाऱ्या काही उड्डाणांमध्येही व्यत्यय येत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी माहिती तपासावी
सौदी अरेबियातील भारतीय नागरिकांनी विमान प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासावी. तसेच भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.विमानसेवेबाबतची परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या विमान कंपनीशी संपर्क साधून उड्डाणाची पुष्टी करून घ्यावी.
---------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी