
पनामा सिटी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य अमेरिकेतील पनामा देशात दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्यानंतर तीन दिवसांनी, मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. पनामामध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
माहितीनुसार, मंगळवारी पहाटे भारतीय वेळेनुसार ४ वाजून ५० मिनिटांनी पनामातील नागरिकांना आणखी एका शक्तिशाली भूकंपाचा सामना करावा लागला. या भूकंपामुळे पुन्हा एकदा रस्ते आणि इमारतींचे नुकसान झाले. पहाटेच भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी सुरक्षिततेसाठी मोकळ्या जागांकडे धाव घेतली.तीन दिवसांपूर्वी, शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटे पनामामध्ये दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के जाणवले होते. या भूकंपांची तीव्रता अनुक्रमे ७.७ आणि ६.६ इतकी होती. तेव्हापासून पनामामध्ये भीतीचे वातावरण आहे.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पनामाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपामुळे केंद्रापासून १०० मैलांहून अधिक अंतरावर असलेल्या राजधानीतील इमारतीही हादरल्या. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर दिवसभरात भूकंपाचे अनेक सौम्य धक्के जाणवले आणि पुन्हा ६.६ तीव्रतेचा आणखी एक शक्तिशाली भूकंप झाला.
या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे पनामातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. भूकंपाचे धक्के राजधानी पनामा सिटीपर्यंत जाणवले. अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, नागरिकांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. भीतीमुळे लोक घरांमधून आणि इमारतींमधून बाहेर पडले. अनेक नागरिकांनी संपूर्ण रात्र मोकळ्या जागेत घालवली. भीतीमुळे घरांमध्ये परतण्याचे धाडस त्यांना होत नव्हते.परिस्थितीबाबत अधिकृत माहिती मिळण्याच्या प्रतीक्षेत नागरिक सकाळपर्यंत घराबाहेरच थांबले होते.दरम्यान, शक्तिशाली भूकंपानंतर पनामा सरकारने मदत आणि बचावकार्याला गती देण्यासाठी तसेच बाधित भागांतील नागरिकांना मदत पुरवण्यासाठी देशात आणीबाणी जाहीर केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode