
अकोला, 13 ऑक्टोबर, (हिं.स.)। बाळापुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी , 2025 -2026 मधील चालू कर्जासह संपूर्ण कर्ज माफ करावे , गतवर्षी व यावर्षाचे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी गौरक्षण च्या धरतीवर शेतकऱ्यांच्या प्रति जनावराला 50 रुपये दर दिवसाला अनुदान द्यावे, शेतमजूर व रोजगारांना 10 हजार रुपये दुष्काळ अनुदान देऊन रोजगार हमी योजनांची कामे त्वरित सुरू करावी या मागण्यासाठी आज रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक अमानकर यांचे नेतृत्वाखाली बाळापुर कचेरीवर शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चात तालुक्यातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. तहसील कचेरी जवळ शिवाजीराव म्हैसने, इजाज खान बुलंद खान, वाडेगावचे माजी सरपंच हिम्मतराव घाटोळ, प्रमोद डोंगरे, संजय शेळके, मनोहर बचाटे, प्रा. दिनकर पाटील, डॉ. मोहम्मद फैयाज, मोहम्मद अकरम यांची भाषणे झाली. शासनाने मागण्याबाबत त्वरित विचार करून मागण्या त्वरित मंजूर कराव्यात मागण्या मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक अमानकर यांनी दिला. संचालन आभार प्रदर्शन रमेश ठाकरे यांनी केले. मोर्चात तालुक्यातील अनेक शेतकरी सामील झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे