अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांसाठी एलॉन मस्क यांची रिपब्लिकन पक्षाला २७६ दशलक्ष डॉलरची देणगी
वॉशिंग्टन , 13 ऑक्टोबर (हिं.स.)।जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी २०२६ च्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी आपली तिजोरी खुली केली आहे.निवडणूक प्रचाराशी संबंधित आर्थिक आकडेवारीनुसार, मस्क
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांसाठी एलॉन मस्क यांची रिपब्लिकन पक्षाला २७६ दशलक्ष डॉलरची देणगी


वॉशिंग्टन , 13 ऑक्टोबर (हिं.स.)।जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी २०२६ च्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी आपली तिजोरी खुली केली आहे.निवडणूक प्रचाराशी संबंधित आर्थिक आकडेवारीनुसार, मस्क यांनी आतापर्यंत सुमारे ३६६ दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत. यापैकी तब्बल २७६ दशलक्ष डॉलरची रक्कम त्यांनी केवळ जुलै महिन्यानंतर दान केली आहे.

वृत्तानुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय देणगी दिल्यामुळे मस्क हे या निवडणूक प्रक्रियेतील सर्वांत मोठे वैयक्तिक देणगीदार ठरले आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये—प्रतिनिधीगृह आणि सिनेटमध्ये—डेमोक्रॅटिक पक्षाचे पुन्हा वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता बळावली असताना मस्क यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या निवडणूक प्रक्रियेत मस्क यांचे व्यावसायिक आणि राजकीय हितसंबंधही पणाला लागले आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मस्क यांना मिळालेल्या सरकारी कंत्राटांची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. याशिवाय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात मस्क यांनी सांभाळलेल्या सरकारी कार्यक्षमता विभागाच्या कामकाजावरूनही विरोधी पक्षाचे नेते त्यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.अशा परिस्थितीत अमेरिकेच्या संसदेवरील रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण कायम राहणे मस्क यांच्यासाठी अधिक अनुकूल मानले जात आहे. मस्क यांच्या सुपर पीएसीच्या प्रवक्त्याने निवडणुकीवरील खर्चाच्या या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

१ जानेवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या निवडणूक चक्रात मस्क यांनी जुलैपासून दिलेल्या २७६ दशलक्ष डॉलरच्या देणगीत सर्वांत मोठा वाटा सिनेट लीडरशिप फंडला मिळाला आहे. या निधीला १५८ दशलक्ष डॉलर देण्यात आले. ही सुपर पीएसी सिनेटमध्ये रिपब्लिकन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करते. तिचा संबंध सिनेटमधील बहुमताचे नेते जॉन थून यांच्याशी आहे.तसेच, प्रतिनिधीगृहाचे सभापती माइक जॉन्सन यांच्याशी संबंधित काँग्रेस लीडरशिप फंड या सुपर पीएसीला २० दशलक्ष डॉलर देण्यात आले.मस्क यांच्या स्वतःच्या ‘अमेरिका पीएसी’ या सुपर पीएसीला ७६ दशलक्ष डॉलर मिळाले आहेत. ही संघटना अमेरिकेतील सात प्रमुख निर्णायक राज्यांमध्ये आणि जवळपास तीन डझन मतदारसंघांमध्ये रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय आहे.

मस्क यांनी टेक्सासमध्ये सिनेटच्या जागेसाठी निवडणूक लढवणारे अटर्नी जनरल केन पॅक्स्टन यांना पाठिंबा देणाऱ्या ‘लोन स्टार लिबर्टी पीएसी’ला १० दशलक्ष डॉलर दिले आहेत. याशिवाय, रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशनला १० दशलक्ष डॉलर आणि रिपब्लिकन अटर्नी जनरल असोसिएशनला २ दशलक्ष डॉलर देण्यात आले आहेत.

वृत्तांनुसार, मस्क यांनी अशा काही संघटनांनाही मोठ्या प्रमाणात गुप्तपणे देणग्या दिल्या आहेत, ज्या आपल्या देणगीदारांची नावे सार्वजनिक करत नाहीत. या निवडणूक चक्रात खर्च झालेल्या एकूण रकमेतून सुमारे ९० दशलक्ष डॉलर मागील निवडणुकांशी संबंधित प्रलंबित खर्च आणि इतर बाबींसाठी वापरण्यात आले.

यामध्ये विस्कॉन्सिन सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेला खर्चही समाविष्ट आहे. या निवडणुकीत मस्क यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. तसेच, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराचे समर्थन करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना प्रत्येकी १० लाख डॉलर देण्याच्या वादग्रस्त योजनेचाही यात समावेश होता.विशेष म्हणजे, मागील सार्वत्रिक निवडणूक चक्रातही मस्क यांनी सुमारे २९० दशलक्ष डॉलर खर्च केले होते. त्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande