
बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। केज तालुक्यातील एक विवाहीत महीला ही नवऱ्या सोबत न राहता अन्य एका विवाहित इसमा सोबत पती-पत्नी सारखे राहत होती. अज्ञातांनी तिचा खून करून प्रेत जीवाचीवाडी आणि चिखलबीड सीमेवर एका ठिकाणी पुरलेले होते. मात्र प्रेत जंगली प्राण्यांनी उकरून ओढत नेले असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. त्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी की, केज तालुक्यातील शिरूर माहेर असलेली ४० वर्षीय महिला हिचे लग्न तुकुचीवाडी येथील बाबुराव रघुनाथ चौरे यांच्या सोबत झाले होते. परंतु ती विवाहित महिला तिच्या पती सोबत न राहता ती जीवाचीवाडी येथील बाळकृष्ण बाबुराव चौरे यांच्या सोबत पती-पत्नी सारखे राहत होते.
दरम्यान अज्ञात व्यक्तींनी तिचा खून करून तिचे प्रेत हे जीवाचीवाडी आणि चिखलबीड ता. वडवणी यांच्या हद्दीत पुरून टाकले होते. परंतु तिचे प्रेत जंगली प्राण्यांनी उकरून उघडले पडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलिस हेडकॉस्टेबल उमेश आघाव आणि पोलिस कॉन्स्टेबल रशीद शेख हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अधिक माहिती घेतली मात्र प्रेत आढळून आलेले ठिकाण हे वडवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर त्यांनी ही माहिती वडवणी पोलिसांना दिली. त्या नंतर वडवणी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रेत ताब्यात घेऊन त्याची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करून गुन्हा नोंद केला.
मयत महिलेचे नाव हे शहाबाई चौरे असल्याचे समजते असून वडवणी पोलिस, केज पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते.
त्या नंतर सखोल तपास केल्या नंतर शहाबाई चौरे या महिलेचा खून हा चौघांनी संगनमत करून केला. त्या नंतर एक दिवस तिचे प्रेत भुस्कटात लपवून ठेवले आणि त्या नंतर ते प्रेत पोत्यात घालून निर्जनस्थळी नेवून पुरले. मात्र प्रेत सडल्या नंतर त्याच्या दुर्गंधीमुळे जंगली प्राण्यांनी ते प्रेत उकरून ओढत नेल्या मुळे या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis