
येवला-नांदगाव महामार्गावरील घटनेत ११ प्रवासी जखमी
येवला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। येवला नांदगाव राज्य महामार्गावरील राजापूर परिसरात आज सकाळी बस आणि कंटेनरची समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून, ११ प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास, नांदगावहून येवल्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका लक्झरी बसची आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर बसमधील ११ प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत तालुका पोलिसांकडून तपास केला जात आहे. सकाळच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे येवला-नांदगाव मार्गावर काही वेळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI