देशात नवरात्री ते दिवाळीदरम्यान ७ लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढालीचा कॅटचा अंदाज
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांनी बुधवारी सांगितले की, यंदा नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत देशभरात ७ लाख कोटी रुपयांहून अधिक सणासुदीची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या विक्रमी उलाढालीच्या तुलनेत यं
CAIT NAVRATRI DIWALI BUSINESS


नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांनी बुधवारी सांगितले की, यंदा नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत देशभरात ७ लाख कोटी रुपयांहून अधिक सणासुदीची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या विक्रमी उलाढालीच्या तुलनेत यंदा त्यात सुमारे १५ ते १८ टक्क्यांची वाढ होऊ शकते. नवरात्री आणि दुर्गापूजेनंतर दसरा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा, गुरु नानक जयंती आणि तुळशी विवाह हे सण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.

कॅटचे राष्ट्रीय महासचिव आणि चांदणी चौकचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशभरातील विविध राज्यांमधील प्रमुख व्यापारी संघटना आणि बाजारपेठांकडून मिळालेला प्रतिसाद, ग्राहकांची मागणी, सणासुदीतील खरेदीचे कल, ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमधील वाढती सक्रियता, स्थानिक उत्पादनांची वाढती मागणी तसेच विविध क्षेत्रांतील व्यापक आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन हा प्राथमिक अंदाज तयार करण्यात आला आहे.

भाजप खासदार म्हणाले की, गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात देशभरात सुमारे ६.०५ लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यापार झाला होता. यामध्ये सुमारे ५.४० लाख कोटी रुपयांच्या वस्तूंच्या व्यापाराचा आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवा क्षेत्रातील उलाढालीचा समावेश होता. यंदा सणासुदीच्या उपक्रमांचा विस्तार अधिक होण्याची शक्यता असल्याने एकूण उलाढाल ७ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.

कॅटच्या अंदाजानुसार, नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतच्या संभाव्य सणासुदीच्या उलाढालीत विविध क्षेत्रांचा वाटा पुढीलप्रमाणे असू शकतो. किराणा आणि एफएमसीजी क्षेत्राचा वाटा १२ टक्के, सोने, चांदी आणि दागिन्यांचा १० टक्के, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा ८ टक्के, ग्राहक टिकाऊ वस्तूंचा ७ टक्के, रेडिमेड कपड्यांचा ७ टक्के, भेटवस्तूंचा ७ टक्के, गृहसजावटीच्या वस्तूंचा ५ टक्के, फर्निचर आणि फर्निशिंगचा ५ टक्के, मिठाई आणि नमकीनचा ५ टक्के, कापड आणि फॅब्रिक्सचा ४ टक्के, पूजासाहित्याचा ३ टक्के, फळे आणि सुकामेव्याचा ३ टक्के, बेकरी आणि कन्फेक्शनरी उत्पादनांचा ३ टक्के, पादत्राणांचा २ टक्के, तर इतर वस्तू आणि संबंधित व्यवसायांचा वाटा १९ टक्के असण्याची शक्यता आहे.

प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, यंदा सणासुदीच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत वाहतूक, लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स डिलिव्हरी, पॅकेजिंग, वेअरहाउसिंग, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पर्यटन, केटरिंग, मंडप आणि सजावट, लाइटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, कॅब आणि स्थानिक वाहतूक यांसह अनेक सेवांना मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सेवा क्षेत्रातील सुमारे ६५ हजार कोटी रुपयांच्या उलाढालीच्या तुलनेत यंदा या क्षेत्रात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार, सणासुदीच्या काळात सेवा क्षेत्राची उलाढाल सुमारे ८० हजार कोटी ते १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

ते म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीच्या काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे देशभरात मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाईल. यामध्ये बाजारपेठांमधील उत्सव, रामलीला, दुर्गापूजेचे मंडप, गरबा आणि दांडिया, दिवाळी मिलन कार्यक्रम, मेळे, प्रदर्शने, स्थानिक बाजारपेठांतील कार्यक्रम, सोसायटी आणि सामुदायिक समारंभ, कॉर्पोरेट कार्यक्रम तसेच कौटुंबिक समारंभांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असेल.

प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, सणासुदीच्या व्यापारातील ही वाढ केवळ ग्राहकांच्या मागणीचा परिणाम नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’, ‘मेड इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना देशातील बाजारपेठा आणि ग्राहकांकडून मिळत असलेल्या व्यापक स्वीकारार्हतेचेही प्रतिबिंब आहे. आज भारतीय ग्राहक स्थानिक कारागीर, एमएसएमई, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, हस्तकला, भारतीय ब्रँड्स आणि देशात उत्पादित वस्तूंना वेगाने प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लहान व्यापारी आणि स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत असून, सणासुदीच्या मागणीचा लाभ देशातील विविध भागांपर्यंत पोहोचत आहे.

ते पुढे म्हणाले की, नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत होणारी ७ लाख कोटी रुपयांहून अधिक संभाव्य उलाढाल हा केवळ व्यापाराचा आकडा नाही. भारताची वाढती ग्राहकशक्ती, स्थानिक बाजारपेठांची मजबुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेचे जनआंदोलनात रूपांतर होत असल्याचा हा पुरावा आहे. या सणासुदीच्या काळात ‘स्थानिक ते राष्ट्रीय आणि राष्ट्रीय ते जागतिक’ ही भावना अधिक बळकट करण्याची गरज आहे. भारतीय उत्पादनांची खरेदी केल्यामुळे व्यापारी, कारागीर, एमएसएमई, महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि स्थानिक सेवा पुरवठादार या सर्वांना लाभ होईल.

भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले, “या दिवाळीचा संदेश स्पष्ट आहे. स्थानिक वस्तू खरेदी करा, भारतीय उत्पादने खरेदी करा, स्थानिक व्यापाराला बळ द्या आणि विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान सुनिश्चित करा.” खंडेलवाल यांनी विश्वास व्यक्त केला की, नवरात्रीपासून दिवाळी २०२६ पर्यंतचा सणासुदीचा काळ देशातील व्यापार, सेवा क्षेत्र आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी एक नवा मैलाचा दगड ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande