कच्च्या तेलाच्या दरवाढीने शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स २५२ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि मंगळवारच्या तेजीमुळे झालेली नफावसुली यांचा परिणाम बुधवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स
Stock Market Closing


नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि मंगळवारच्या तेजीमुळे झालेली नफावसुली यांचा परिणाम बुधवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदवली. सेन्सेक्स २५१.८९ अंकांनी म्हणजेच ०.३४ टक्क्यांनी घसरून ७२,७८१.८९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० मध्ये 99.25 अंकांनी म्हणजेच ०.४४ टक्क्यांची घसरण होऊन तो २२,६२२.७० अंकांवर स्थिरावला.

बुधवारी निफ्टीने सुरुवातीला सावध व्यवहार केले. त्यानंतर सकाळच्या सत्रात काहीशी सुधारणा होत निर्देशांकाने २२,७५७.९५ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र, बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याने निफ्टी २२,६५० अंकांच्या खाली घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०६ डॉलरच्या आसपास पोहोचल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताला कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत असल्याने तेलाच्या दरवाढीचा परिणाम देशाच्या आयात खर्चावर, महागाईवर आणि कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्रीही बाजारातील घसरणीचे महत्त्वाचे कारण ठरली. १३ ऑक्टोबर रोजी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात १,३०५.१३ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली. याउलट देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,४३९.२४ कोटी रुपयांची खरेदी केली. परदेशी गुंतवणूकदारांची सलग १३ सत्रांपासून सुरू असलेली विक्री बाजारासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये औषधनिर्मिती आणि वित्तीय सेवा क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. या दोन्ही क्षेत्रांचे निर्देशांक एक टक्क्याहून अधिक घसरले, तर निफ्टी बँक निर्देशांक सुमारे ०.३ टक्क्यांनी खाली आला. स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप शेअर्समध्येही आज मंदी कायम राहिली. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.०८ टक्क्यांनी किंचित घसरला, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक ०.३२ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

दरम्यान, बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरले असले, तरी एकूण बाजारातील व्यवहारांची व्याप्ती सकारात्मक राहिली. राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार झालेल्या ३,६६७ समभागांपैकी २,०२४ समभाग वधारले, तर १,५३७ समभाग घसरले. १०६ समभागांच्या दरात बदल झाला नाही. सेन्सेक्समधील शेअर्सपैकी, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इटरनल, आयसीआयसीआय बँक आणि इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) यांना सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. तर इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअर्समध्ये वाढ झाली होती. यापूर्वी मंगळवारी बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. त्या दिवशी सेन्सेक्स १,१०९.१० अंकांनी, तर निफ्टी ३५८.६० अंकांनी वधारला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande