
मुंबई, १५ ऑक्टोबर (हिं.स.) : जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क असलेल्या लिंक्डइन ने आज भारतातील २०२६ मधील टॉप स्टार्टअप्सची यादी जाहीर केली. करिअरच्या दृष्टीने उत्तम संधी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या उदयोन्मुख कंपन्यांची ही वार्षिक क्रमवारी आहे. रोजगारवाढ, प्लॅटफॉर्मवरील सहभाग, नोकऱ्यांबद्दलची स्वारस्ये आणि आघाडीच्या प्रतिभावंतांना आकर्षित करण्याची क्षमता यासंबंधीच्या लिंक्डइन च्या विशेष डेटाच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. देशातील वेगाने प्रगती करणाऱ्या कंपन्या आणि संभाव्य करिअर संधींचा शोध घेण्यासाठी ही यादी व्यावसायिकांना उपयुक्त ठरते.
क्विक-कॉमर्स कंपनी झेप्टो ने सलग चौथ्या वर्षी पहिला क्रमांक कायम राखला आहे. त्यानंतर topmate.io (#2) आणि Matiks (#3) यांचा क्रमांक लागतो. पहिल्या पाच कंपन्यांपैकी चार कंपन्यांचा या यादीत प्रथमच समावेश झाला आहे. तसेच, यंदाच्या टॉप २० यादीत १३ नवीन कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. यावरून भारतातील स्टार्टअप परिसंस्थेत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांना मिळणारी वाढती लोकप्रियता आणि बदलते व्यावसायिक स्वरूप स्पष्ट होते.
क्विक सर्व्हिस आणि AI कंपन्यांचे यंदाच्या यादीत वर्चस्व
मागील वर्षी १४ व्या क्रमांकावर असलेली मागणीनुसार घरकामासाठी मदत पुरवणारी सेवा Snabbit यंदा सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याशिवाय, १० मिनिटांत खाद्यपदार्थ आणि किराणा माल पोहोचवणारे Swish (#11) आणि FirstClub (#16) हे प्लॅटफॉर्मही क्विक-कॉमर्स क्षेत्राची वाढती लोकप्रियता दर्शवतात.
यंदाच्या यादीत कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI) देखील महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. टॉप २० स्टार्टअप्सपैकी सहा कंपन्यांच्या मुख्य व्यवसायाचा केंद्रबिंदू AI सेवा आहेत. Sarvam (#9) या कंपनीच्या मूलभूत AI मॉडेल्सपासून ते Weekday (YC W21) (#8) च्या AI-आधारित भरती प्रक्रियेपर्यंत आणि Zetheta Algorithms (#5) च्या गुंतवणूकविषयक उपायांपर्यंत, विविध उद्योगांमध्ये AI चा वाढता वापर या कंपन्यांमधून दिसून येतो.
कंटेंट, कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख संधी
कौशल्य, कंटेंट आणि शैक्षणिक प्लॅटफॉर्म्समध्येही या यादीतून नव्या संधी अधोरेखित झाल्या आहेत. यामध्ये topmate.io (#2), Figuring Out Media & Education (#4) आणि शिक्षण क्षेत्रातील स्टार्टअप Bhanzu (#18) यांचा समावेश आहे.
व्यावसायिकांसाठी यंदाच्या यादीतील कंपन्यांची विविधता ही उदयोन्मुख व्यवसाय समजून घेण्याची आणि आपल्या कौशल्यांचा प्रभावी वापर कुठे करता येईल, हे जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देते.
व्यावसायिक नेटवर्कच्या मदतीने आवडीचे रूपांतर संधींमध्ये
भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेत करिअरच्या नव्या संधी निर्माण होत असताना त्या शोधण्याची आणि त्यांचा योग्य प्रकारे लाभ घेण्याची पद्धतही बदलत आहे. या प्रक्रियेत विश्वासार्ह व्यावसायिक नेटवर्क महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
LinkedIn च्या ताज्या आकडेवारीनुसार, १० ते ४९ कर्मचारी असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांपैकी
• ९४% व्यावसायिकांच्या मते, करिअरच्या वाटचालीत योग्य दिशा मिळवण्यासाठी त्यांचे व्यावसायिक नेटवर्क महत्त्वाचे आहे.
• ३५% व्यावसायिकांना त्यांच्या संपर्कांमुळे करिअरमध्ये मदत मिळाली आहे.
• २९% व्यावसायिकांना त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून नोकरी किंवा नवीन संधीची माहिती मिळाली आहे.
लिंक्डइनच्या तज्ज्ञांचे मत
यंदाच्या यादीबद्दल बोलताना लिंक्डइन च्या करिअर तज्ज्ञ आणि लिंक्डइन इंडिया न्यूज च्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निरजिता बॅनर्जी म्हणाल्या, “यंदाची यादी भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेतील वाढत्या महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करते. क्विक-कॉमर्स क्षेत्रातील सातत्याने होणारे बदल असोत किंवा विविध व्यवसायांमध्ये AI ची वाढती भूमिका असो, या सर्व घडामोडी त्यातून दिसून येतात. त्याचबरोबर शिक्षणकेंद्रित आणि कंटेंटवर आधारित कंपन्यांमधील उदयोन्मुख संधीही अधोरेखित होतात.
व्यावसायिकांसाठी एखादी कंपनी नेमके काय उभारत आहे आणि ती कोणत्या कौशल्यांना महत्त्व देते, हे समजून घेतल्याने अधिक माहितीपूर्ण करिअरविषयक निर्णय घेता येतात. त्याचप्रमाणे, योग्य व्यावसायिक संपर्क निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा संपर्कांमधून मौल्यवान माहिती मिळू शकते आणि ज्या संधी सहजपणे दिसून येत नाहीत, त्यांची दारेही खुली होऊ शकतात.”
झेप्टो : महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रतिभावंतांना प्राधान्य
झेप्टोच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) स्नेहा अरोरा म्हणाल्या, झेप्टोमध्ये प्रतिभावंतांच्या बाबतीत आमची सर्वात मोठी गुंतवणूक ही महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारीची जाणीव यांचा संगम असलेल्या लोकांवर आहे. प्रस्थापित पद्धतींना आव्हान देण्याची, गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याची आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करता येईल असे व्यवसाय उभारण्याची तयारी असलेल्या लोकांना आम्ही प्राधान्य देतो.
वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपमध्ये संधी केवळ एखाद्या पदापुरती मर्यादित नसते. आमच्या मते, वेगाने शिकणे, अर्थपूर्ण आव्हाने स्वीकारणे आणि पहिल्या दिवसापासूनच ठोस प्रभाव निर्माण करणे, यातच खरी संधी दडलेली असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी