स्वतःच्या आयुष्याची नायिका बना - अभिनेत्री प्राप्ती रेडकर
मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्र म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याचा उत्सव आणि तिच्यातील दुर्गाशक्तीला वंदन करण्याचा काळ! देवीच्या विविध रूपांची पूजा करताना तिच्यातील धैर्य, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही आपल्याला प्रेरणा देते. मात्र,
स्वतःच्या आयुष्याची नायिका बना’, अभिनेत्री प्राप्ती रेडकरचा नवरात्रीनिमित्त महिलांना आत्मविश्वासाचा संदेश


मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्र म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याचा उत्सव आणि तिच्यातील दुर्गाशक्तीला वंदन करण्याचा काळ! देवीच्या विविध रूपांची पूजा करताना तिच्यातील धैर्य, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही आपल्याला प्रेरणा देते. मात्र, स्त्रीशक्ती ही केवळ देवीच्या पूजेपुरती मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या विचारांत, निर्णयांत आणि स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहण्याच्या वृत्तीतही दिसून येते. आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं, चुकीच्या गोष्टींना विरोध करणं आणि स्वाभिमानाने जगणं, हीच खरी स्त्रीशक्ती आहे. झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ‘सावली’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिचाही स्त्रीशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच आहे. नवरात्रीच्या निमित्ताने तिने स्वसंरक्षणाचं महत्त्व आणि स्वतःच्या आयुष्याची नायिका होण्याचा दिलेला संदेश खास आहे.

माझ्यासाठी स्त्रीशक्ती म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जपणं आणि स्वतःसाठी योग्य स्टँड घेणं. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल, तर स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहणं, ही माझ्यासाठी स्त्रीशक्ती आहे. मला असं वाटतं की आजच्या काळात प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षणाची माहिती असायलाच हवी. मी असं म्हणत नाही की प्रत्येक मुलीने कराटे किंवा इतर कोणती कला शिकलीच पाहिजे;पण स्वतःचं संरक्षण कसं करायचं, याची जाणीव प्रत्येक स्त्रीला असणं गरजेचं आहे. सध्याचा काळ असा आहे की कधी, काय घडेल, याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीविषयी बोलताना मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला संकटाच्या वेळी स्वतःला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे.

मला या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक महिला आणि मुलीला एवढाच संदेश द्यायचा आहे की, स्वतःची काळजी घ्या आणि काहीही झालं तरी खचून जाऊ नका. स्वतःसोबत काही चुकीचं घडत असेल, तर त्याचा विरोध करा आणि स्वतःसाठी हिंमतीने लढा. तुम्हाला हवं तसं जगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण असं जगा की तुम्हीच तुमच्या आयुष्याच्या मुख्य भूमिकेत आहात. तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आयुष्याची नायिका बनावं आणि खंबीरपणे जगावं.

मी २०२२ पासून मार्शल आर्ट शिकतेय. सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे माझा सराव सुरू नाही पण मार्शल आर्ट शिकण्याआधी आणि शिकल्यानंतर माझ्यात खूप फरक जाणवला. पूर्वी कधी माझ्यासोबत कोणी जाणूनबुजून चुकीचं वागलं किंवा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, तर मला खूप अस्वस्थ वाटायचं. त्या वेळी समोरच्याला विरोध करण्याचा किंवा त्याला काही बोलण्याचा आत्मविश्वास माझ्यात नव्हता. मात्र, मार्शल आर्ट शिकल्यानंतर माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला.

माझ्यातल्या स्त्रीशक्तीचा अनुभव मला एका प्रसंगातून आला. एकदा मालाड स्टेशनवर एका मुलाने मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला. त्या वेळी तो कोण होता, हे माझ्या लक्षात आलं नाही पण नंतर तो पुन्हा त्याच हेतूने माझ्या दिशेने येताना दिसला. तेव्हा मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर तो माफी मागू लागला आणि तिथून पळून गेला. तो क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता, कारण तेव्हा मला माझ्यातली स्त्रीशक्ती जाणवली. म्हणूनच मी नेहमी सांगते की प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला निदान स्वतःचं संरक्षण करण्याइतकी तरी माहिती असायला हवी.

माझ्यासाठी नवरात्र हा केवळ देवीच्या आराधनेचा नव्हे, तर आनंद, उत्साह आणि एकत्र येऊन सण साजरा करण्याचाही काळ आहे. माझ्या नानींच्या घराजवळच सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लहान मुलांचे खेळ, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी विविध स्पर्धा, गरबा, फॅन्सी ड्रेस गरबा आणि पाककला स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. या सगळ्या कार्यक्रमांत सहभागी होताना आणि मित्रमंडळींसोबत धमाल करताना नवरात्रीचे दिवस कसे जातात, हे मला कळतही नाही. याशिवाय, विविध नवरात्र मंडळांकडून आलेल्या आमंत्रणांना प्रतिसाद देत मी आवर्जून दर्शनासाठीही जाते. या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि उत्सवातील उत्साह मला विशेष भावतो.

स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या या नवरात्रीत प्राप्ती रेडकरचा संदेश प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा आहे. स्वाभिमान जपणं, स्वतःसाठी आवाज उठवणं आणि आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानाचा सामना करणं, हीच खरी शक्ती!

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande