
मुंबई, १४ ऑक्टोबर, (हिं.स): नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात यश 'रावण'ची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी यशच्या लूकबाबत अभिनेता आर्य बब्बरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत आर्यने सांगितले की, रावण म्हणून यशच्या दिसण्यात त्याला आतापर्यंत काही विशेष नवीन वाटले नाही; त्याने या लूकची तुलना 'केजीएफ' (KGF) चित्रपटातील यशच्या लूकशी केली. मात्र, संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच या पात्राबाबत अंतिम मत बनवता येईल, असेही आर्यने नमूद केले.
आर्य बब्बर सध्या 'महाबली' या नाटकात रावणाची भूमिका साकारत आहे. चर्चेदरम्यान त्याने 'आदिपुरुष' चित्रपटातील सैफ अली खानच्या अभिनयाचा बचाव केला. आर्यच्या मते, सैफने दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनानुसार पात्र साकारले आणि भूमिकेत एक वेगळी तीव्रता आणण्याचा प्रयत्न केला. एखाद्या पात्राच्या सादरीकरणासाठी केवळ अभिनेत्यालाच जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे त्याने म्हटले. यशबाबत बोलताना त्याने नमूद केले की, 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटात त्याने या अभिनेत्याची एक नवीन शैली पाहिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या, साई पल्लवी माता सीतेच्या, यश रावणाच्या, रवी दुबे लक्ष्मणाच्या आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, त्याचा पहिला भाग ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर