रत्नागिरी : अधिक परताव्याच्या आमिषाने दाम्पत्याची ११ लाखांची सायबर फसवणूक
रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं.स.) । शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतल्या एका दाम्पत्याची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसां
सायबर फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक


रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं.स.) । शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतल्या एका दाम्पत्याची ११ लाख ३७ हजार १४ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, सोलापूरमधील दादासाहेब चौगुले आणि धाराशीवमधील तुषार चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना रत्नागिरीत न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या पतीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करून आयपीओ आणि ओटीसी व्यवहारांतून अधिक परतावा मिळण्याचे आमिष त्यांना दाखवले. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरोपींनी दाम्पत्याशी वारंवार संपर्क साधून गुंतवणूक आणि व्यवहारांच्या कारणास्तव विविध बँक खात्यांमध्ये एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये जमा करण्यास भाग पाडले होते.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा, खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि स्थानिक माहितीचा आधार घेतला. त्यातून दादासाहेब चौगुले आणि तुषार चौधरी यांचा सहभाग निष्पन्न झाला. सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक तुषार यादव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सोहम कदम आणि आदर्श इंगळे यांच्या पथकाने तपास केला.

शेअर बाजारातील व्यवहार किंवा ऑनलाइन गुंतवणुकीत कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. अनोळखी व्यक्ती, बनावट साधने, तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम समूहांवरून मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नये. गुंतवणुकीपूर्वी संबंधित योजनेची सत्यता आणि संस्थेची अधिकृतता तपासावी. आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande