रत्नागिरी : खाऊच्या पैशांतून विद्यार्थ्यांकडून मतिमंद शाळेला ३० हजारांची मदत
रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्वतःच्या खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांतून बचत करून गरजू मुलांना मदतीचा हात देत खेर्डी-चिंचघरी सती येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. विद्यार्थ्यांनी एकत्रित केलेला ३० हजार रुप
सती चिंचघरी शाळेतील विद्यार्थ्यांची देणगी


रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्वतःच्या खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांतून बचत करून गरजू मुलांना मदतीचा हात देत खेर्डी-चिंचघरी सती येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. विद्यार्थ्यांनी एकत्रित केलेला ३० हजार रुपयांचा निधी जिद्द मतिमंद शाळेतील विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सुपूर्द करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना आणि गरजू व्यक्तींविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने आपल्या खाऊच्या पैशांतून बचत करून या मदतकार्यात योगदान केले. त्यांच्या या कृतीतून दातृत्वाची भावना आणि माणुसकीचे दर्शन घडले.

जिद्द मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांच्याकडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सकपाळ सर आणि शिक्षकवृंदाने ३० हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला. या मदतीमुळे विशेष गरजा असलेल्या मुलांना आधार मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये परोपकार, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

उपक्रमासाठी पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्यासह शिक्षिका मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, वर्षा सकपाळ, शीतल पाटील आणि स्वरा भुरण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande