
लातूर, १५ ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका आणि जुगार अड्ड्यांविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली. जिल्ह्यातील तीन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ७६ हजार ५३० रुपयांची रोकड, १६ मोबाईल आणि सहा मोटारसायकली असा एकूण ५ लाख ८५ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लातूर जिल्ह्यात अवैध मटका आणि जुगार व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात कारवाईसाठी पाठविले. या पथकाने लातूर शहरातील दोन ठिकाणी आणि निलंगा येथे एका ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.
गांधी चौक हद्दीत दोन मटका बुकींवर छापे
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुळ मार्केट ते सम्राट चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शिमला बारच्या शेजारील एका शटरमध्ये मटका बुकी सुरू असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून ९ हजार ५४० रुपयांची रोकड आणि ३७ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल, असा एकूण ४६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१५/२०२६ नोंदवून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
यानंतर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंजगोलाई परिसरात इंगळे बारच्या शेजारील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकण्यात आला. येथे १० हजार २५० रुपयांची रोकड आणि ६७ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल, असा एकूण ७७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातही नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक ७१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
निलंग्यात तिर्रट जुगारावर कारवाई
लातूर शहरातील कारवायांनंतर विशेष पथकाने निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही छापा टाकला. आडत लाईनच्या पाठीमागे निळकंठ कुंभार यांच्या मोकळ्या प्लॉटवरील पत्र्याच्या शेडसमोर तिर्रट नावाचा जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत ५६ हजार ७४० रुपयांची रोकड, सहा मोबाईल आणि सहा मोटारसायकली, असा एकूण ४ लाख ६१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis