
मुंबई, 16 ऑक्टोबर (हिं.स.) - “इट्स डन ब्रो, सर्वकाही जाहीर झालंय. अखेर हे सर्वकाही सत्ता बदलासाठी आहे. शेवटी मनात होतं ते ओठांवर आलंच, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे. सर्व खेळ सत्तेची खुर्ची मिळवण्याचा आहे. मग, त्यासाठी विद्यार्थी, शेतकऱ्यांना चिथावणी द्यावी लागली तरी चालेल, जाती, भाषेच्या नावावर द्वेष परसवावा लागला तरी चालेल. देशाच्या प्रतिष्ठीत संस्थांची प्रतिमा मलीन केली जातेय. आंदोलनाच्या आडून अराजकता पसरवण्याचा यांचा उद्देश आहे, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली प्रेस क्लबमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी देशात रिजीम चेंज हवा असं म्हटलं आहे. त्यात काही चुकीचं नाहीय असं त्यांचं म्हणणं आहे. मोदी सरकार देशात निवडणूक लोकशाही चिरडून टाकण्यावर ठाम आहे, असं प्रशांत भूषण म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भूषण पुढे म्हणाले की, हे सरकार वारंवार बोलतं की, विरोधी पक्षाकडून हा सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न आहे. आम्ही फक्त देशात निवडणूक लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय. ही अशीच क्रूरता सुरु राहिली तर सत्ता परिवर्तन जरुर होईल. आम्हासर्वांना सत्ता परिवर्तन हवं आहे. यात काही चुकीचं आहे का? सत्ता परिवर्तन प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. सरकार विरोधात असंतोष व्यक्त करणं हा गुन्हा नाहीय.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी