नाशिक : टीसीएस प्रकरणामुळे कुटुंबाला मानसिक त्रास झाला- मोईन खान
निदा खानपासून घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम पहिल्या समुपदेशनानंतरही निर्णय कायम नाशिक, १६ ऑक्टोबर (हिं.स.) : टीसीएस प्रकरणामुळे आपल्या कुटुंबाला वाईट अनुभवांचा सामना करावा लागला असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच समाजात वावरतानाही अ
Counseling for husband and


निदा खानपासून घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम

पहिल्या समुपदेशनानंतरही निर्णय कायम

नाशिक, १६ ऑक्टोबर (हिं.स.) : टीसीएस प्रकरणामुळे आपल्या कुटुंबाला वाईट अनुभवांचा सामना करावा लागला असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच समाजात वावरतानाही अडचणी येत असल्याचे निदा खानचा पती मोईन नाविद खान याने कौटुंबिक न्यायालयात सांगितले. पहिल्या समुपदेशनानंतरही निदा खानपासून घटस्फोट घेण्याच्या आपल्या निर्णयावर मोईन ठाम असल्याचे समोर आले आहे.

टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खान हिच्याविरुद्ध तिचा पती मोईन नाविद खान याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली. यावेळी पती-पत्नी दोघेही न्यायालयात समोरासमोर उपस्थित होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार दोघांचे समुपदेशन करण्यात आले.

समुपदेशनादरम्यान मोईन याने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. टीसीएस प्रकरण समोर येण्यापूर्वीपासूनच निदाचे घरातील वर्तन योग्य नसल्याचे त्याने सांगितले. तसेच या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंबाला नकारात्मक अनुभवांचा सामना करावा लागला असून, त्यातून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद केले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजात लोकांमध्ये वावरताना येणाऱ्या अडचणींचाही त्याने उल्लेख केला.

पहिल्या समुपदेशनानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंना विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, मोईन याने घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, घटस्फोटाच्या अर्जावर २० नोव्हेंबर २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अर्जदार मोईन नाविद खान यांच्यातर्फे ऍड. नितीन पंडित, तर प्रतिवादी निदा खान हिच्यातर्फे ऍड. शोभा ताजनपुरे बाजू मांडत आहेत.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande