
अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, अकोला जिल्ह्यात एकूण १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर एकूण ५ हजार ९४२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अमरावती विभागातील संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रे व मतदारसंख्या
अकोट
१. मतदान केंद्र क्रमांक २६ : निवासी नायब तहसीलदार यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, पोपटखेड रोड, अकोट — उत्तरेकडील डाव्या बाजूची खोली, पिन कोड ४४४१०१. एकूण मतदार : ५१६.
२. मतदान केंद्र क्रमांक २७ : महसूल नायब तहसीलदार यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, पोपटखेड रोड, अकोट — उत्तरेकडील उजव्या बाजूची खोली, पिन कोड ४४४१०१. एकूण मतदार : ५०७.
तेल्हारा
३. मतदान केंद्र क्रमांक २८ : संजय गांधी विभाग, तहसील कार्यालय, तेल्हारा, पिन कोड ४४४१०८. एकूण मतदार : ३५०.
अकोला शहर
४. मतदान केंद्र क्रमांक २९ : राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, मूर्तिजापूर रोड, अकोला — खोली क्रमांक १, पिन कोड ४४४००१. एकूण मतदार : ४३७.
५. मतदान केंद्र क्रमांक ३० : राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, मूर्तिजापूर रोड, अकोला — खोली क्रमांक २, पिन कोड ४४४००१. एकूण मतदार : ५९८.
६. मतदान केंद्र क्रमांक ३१ : राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, मूर्तिजापूर रोड, अकोला — खोली क्रमांक ३, पिन कोड ४४४००१. एकूण मतदार : ४७५.
७. मतदान केंद्र क्रमांक ३२ : सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला — खोली क्रमांक १, सिव्हिल लाईन, अकोला, पिन कोड ४४४००१. एकूण मतदार : ४९४.
८. मतदान केंद्र क्रमांक ३३ : सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला — खोली क्रमांक २, सिव्हिल लाईन, अकोला, पिन कोड ४४४००१. एकूण मतदार : ५१२.
९. मतदान केंद्र क्रमांक ३४ : सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला — खोली क्रमांक ३, सिव्हिल लाईन, अकोला, पिन कोड ४४४००१. एकूण मतदार : ५०२.
बाळापूर
१०. मतदान केंद्र क्रमांक ३५ : पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, बाळापूर, पिन कोड ४४४३०२. एकूण मतदार : ५०२.
पातूर
११. मतदान केंद्र क्रमांक ३६ : नायब तहसीलदार (महसूल) यांचे दालन, तहसील कार्यालय, पातूर, पिन कोड ४४४५०१. एकूण मतदार : ३८३.
मूर्तिजापूर
१२. मतदान केंद्र क्रमांक ३७ : नायब तहसीलदार, मूर्तिजापूर संगांयो यांचे दालन, तहसील कार्यालय, मूर्तिजापूर, पिन कोड ४४४१०७. एकूण मतदार : ४४५.
बार्शीटाकळी
१३. मतदान केंद्र क्रमांक ३८ : पंचायत समिती सभागृह, बार्शीटाकळी, पिन कोड ४४४४०१. एकूण मतदार : २२१.
या सर्व मतदान केंद्रांवरील मतदारांची एकूण संख्या ५ हजार ९४२ आहे. मतदान केंद्रांची यादी अकोला जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मत नोंदविताना या सूचनांचे पालन करा
विधानपरिषद निवडणुकीत मतदान करताना मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य पेन, पेन्सिल किंवा बॉलपेनचा वापर करू नये. पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात '१' हा पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतरचे पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे.
पसंतीक्रम अंकांमध्ये नोंदवावेत. एका उमेदवारासमोरील रकान्यात एकच पसंतीक्रम लिहावा आणि तोच क्रमांक दुसऱ्या उमेदवारासमोर लिहू नये. मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. पसंतीक्रम नोंदविताना टिकमार्क किंवा 'X' अशी खूण करू नये; अन्यथा मतपत्रिका अवैध ठरू शकते.
मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्राचा तपशील पाहण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक विभागाच्या मतदार शोध सुविधेचा (https://mahaelection.gov.in/Citizen/Search) वापर करता येईल. ही सुविधा अकोला जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे व गॅझेट सोबत नेण्यास मनाई असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी अकोला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची संबंधित कार्यक्षेत्रासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची संबंधित कार्यक्षेत्रासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांसाठी १३ मतदान केंद्राध्यक्ष, ३९ मतदान अधिकारी आणि १३ मायक्रो ऑब्झर्व्हर नियुक्त करण्यात आले आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, पात्र मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला यांच्या वतीने करण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे