
लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
वलांडीतील घटनेने पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घराच्या अंगणात पाणी ठेवण्याचे आवाहन
दुष्काळाच्या झळा आता मुक्या जीवांनाही सोसाव्या लागत आहेत. देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात पाण्याअभावी चिमणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने उन्हाळ्यातच नव्हे, तर पाण्याची टंचाई असलेल्या काळात पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले आहे.
पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने शेतशिवार आणि मानवी वस्तीत वावरणाऱ्या पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
माणसांसाठी पाण्याची सोय करताना तहानलेल्या पक्ष्यांकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होते. वलांडीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा झाडाच्या सावलीत स्वच्छ पाण्याचे भांडे ठेवावे. त्यातील पाणी नियमित बदलावे आणि भांडे स्वच्छ ठेवावे. प्रत्येकाने एवढी छोटी कृती केली, तरी तहानलेल्या पक्ष्यांना मोठा आधार मिळू शकतो. मुक्या जीवांची तहान भागवणे ही केवळ माणुसकी नव्हे, तर निसर्गाप्रती आपली जबाबदारीही आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis