
मुंबई, १९ ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय गुंतवणूकदारांमध्ये जागतिक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याची रुची वाढत आहे. देशांतर्गत इक्विटी बाजाराच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्लाउड कम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी मिळवणे, ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. या क्षेत्रांतील अनेक आघाडीच्या कंपन्या अमेरिकी शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत.
GIFT सिटीमार्फत आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची सुविधा देण्यासाठी ब्रोकरना IFSCA ची मंजुरी मिळाल्यानंतर एंजेल वनने आपल्या ॲपवर अमेरिकी शेअरमध्ये गुंतवणुकीची सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आता भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या भारतीय गुंतवणूक पोर्टफोलिओसोबतच अमेरिकी बाजारात सूचीबद्ध असलेल्या शेअर आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्येही गुंतवणूक करता येणार आहे. यामध्ये ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन आणि एनव्हिडिया यांसारख्या लोकप्रिय कंपन्यांसह नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय आणि टोयोटा यांचाही समावेश आहे.
फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंगची सुविधा
फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंगच्या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना एखाद्या शेअरची पूर्ण युनिट खरेदी करण्याऐवजी त्याचा काही भागही खरेदी करता येईल. सध्या ही सुविधा निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ती सर्व वापरकर्त्यांसाठी सुरू केली जाणार आहे.
गुंतवणूकदार कोटक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करू शकतील.
खाते उघडणे, खात्याची देखभाल करणे, पैसे जमा करणे आणि पैसे काढणे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. डिसेंबर २०२६ पर्यंत ब्रोकरेज शुल्क माफ असेल. जानेवारी २०२७ पासून प्रत्येक व्यवहारावर ०.१ टक्के ब्रोकरेज शुल्क आकारले जाईल. हे शुल्क किमान ०.९९ अमेरिकी डॉलर असेल. नियामक शुल्क, जीएसटी आणि बँकेचे परकीय चलन विनिमय दर लागू होतील.
ही गुंतवणूक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत निर्धारित नियमांनुसार केली जाईल. पात्र अमेरिकी प्रतिभूतींवर सिक्युरिटीज इन्व्हेस्टर प्रोटेक्शन कॉर्पोरेशन (SIPC) अंतर्गत ५,००,००० अमेरिकी डॉलरपर्यंत संरक्षण उपलब्ध आहे.
या उपक्रमामुळे भारतीय गुंतवणूकदारांना अमेरिकी बाजारपेठांमध्ये गुंतवणुकीची सुविधा देणाऱ्या अन्य प्लॅटफॉर्मच्या यादीत एंजेल वनचाही समावेश झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी