
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीला (आयपीओ) संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुमारे २.५ लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जिओ प्लॅटफॉर्म्सची ६६.४३ टक्के हिस्सेदारी आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ८,११० कोटी रुपयांच्या ‘अँकर बुक’साठी निश्चित केलेल्या रकमेच्या तुलनेत ३० पटींपेक्षा अधिक बोली मिळाल्या आहेत. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये हिस्सेदारी घेण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये जागतिक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, सरकारी गुंतवणूक निधी, देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांचा समावेश आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओच्या माध्यमातून ३०,२१३ कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ २१ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि २३ ऑक्टोबर रोजी बंद होईल.
कंपनीने या आयपीओसाठी प्रति समभाग १,०६५ ते १,११९ रुपये अशी किंमत निश्चित केली आहे. या निर्गमात २७ कोटींपर्यंत नवीन समभाग जारी केले जाणार आहेत. यामध्ये विद्यमान भागधारकांकडून समभाग विक्रीची ऑफर (ओएफएस) समाविष्ट नसेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ही उपकंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या आयपीओच्या दस्तऐवजानुसार, या माध्यमातून उभारलेल्या निधीचा काही भाग दूरसंचार क्षेत्रातील तिच्या उपकंपनीचे कर्ज फेडण्यासाठी आणि सामान्य व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सचा हा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक निर्गम ठरण्याची अपेक्षा आहे. आयपीओच्या निश्चित केलेल्या किंमतपट्ट्यातील सर्वोच्च किमतीनुसार कंपनीचे मूल्यांकन सुमारे १०८ अब्ज अमेरिकी डॉलर होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule