
गुंतवणूकदारांचे ५.६४ लाख कोटी रुपये बुडाले
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोमवारी बाजारात सर्वच क्षेत्रांत विक्रीचा दबाव दिसून आला. व्यवहाराच्या सुरुवातीला किरकोळ वाढ नोंदवणारा सेन्सेक्स आणि निफ्टी काही वेळातच घसरले. दिवसभरात बँकिंग क्षेत्रातील काही शेअर्सच्या आधारावर बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र ही तेजी टिकू शकली नाही. दिवसअखेर सेन्सेक्स १.१७ टक्के, तर निफ्टी १.११ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ५.६४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी ७४,७२९.२७ अंकांवर बंद झाला होता. सोमवारी तो १२०.०३ अंकांच्या वाढीसह ७४,८४९.३० अंकांवर उघडला. मात्र, बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री सुरू केली. त्यामुळे सेन्सेक्सने सुरुवातीची वाढ गमावली आणि काही वेळातच तो घसरणीच्या लाल निशाणावर आला. विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स १,०२०.७३ अंकांनी घसरून ७३,७०८.५४ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर काही प्रमाणात खरेदी झाल्याने निर्देशांक सावरला. अखेर सेन्सेक्स ८७६.३७ अंकांच्या घसरणीसह ७३,८५२.९० अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील घसरणीतून सुटू शकला नाही. निफ्टीने ४.७० अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,१५०.८५ अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. मात्र, बाजार उघडल्यानंतर विक्रीचा जोर वाढल्याने निर्देशांक घसरला. दिवसभरात निफ्टी ३०१.१५ अंकांनी घसरून २२,८४५ अंकांपर्यंत खाली आला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे काही प्रमाणात सुधारणा झाली. तरीही दिवसअखेर निफ्टी २५७.२० अंकांच्या घसरणीसह २२,८८८.९५ अंकांवर बंद झाला.
क्षेत्रनिहाय व्यवहारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी तुलनेने चांगली कामगिरी केली. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात २.४६ टक्क्यांची वाढ झाली. याउलट खासगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याने निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक १.८५ टक्क्यांनी घसरला. निफ्टी आयटी निर्देशांक १.२८ टक्के, एफएमसीजी निर्देशांक १.४४ टक्के आणि फार्मा निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी घसरले. मिडकॅप १०० निर्देशांकात १.०९ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांकात १.०१ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
आजच्या दिवसातील व्यवहारानंतर, शेअर बाजारातील मोठ्या स्टॉक्सपैकी, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी, एसबीआय, एल अँड टी आणि आयशर मोटर्स यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. दुसरीकडे अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
दरम्यान, मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य घसरून ४६७.८२ लाख कोटी रुपयांवर आले. मागील आठवड्याच्या अखेरच्या दिवशी हे मूल्य ४७३.४६ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.६४ लाख कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील व्यापक विक्रीमुळे बहुतांश शेअर्स घसरणीसह बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार झालेल्या ३,२५९ शेअर्सपैकी ७३३ शेअर्स वाढीसह, तर २,५२६ शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule