
लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील मुलींना योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास त्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, हे बिंदगीहाळ येथील मुलींनी सिद्ध केले आहे. हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलींच्या हॉकी संघाने लातूर विभागस्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामुळे लातूर जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राज्यस्तरावर झळकणार आहे.
लातूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दयानंद विद्यालय, बाभळगाव येथे विभागीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बिंदगीहाळच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नांदेड महानगरपालिका आणि नांदेड ग्रामीण या दोन्ही संघांवर मात केली. वेगवान खेळ, अचूक पासिंग आणि गोलरक्षकाच्या भक्कम बचावाच्या जोरावर संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. ग्रामीण भागात हॉकीसारख्या खेळासाठी आवश्यक सुविधा आणि क्रीडा साहित्याची उपलब्धता मर्यादित असतानाही या मुलींनी सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या कामगिरीने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली.
माझं लातूर परिवाराचे सात वर्षांपासून सहकार्य
या यशामागे माझं लातूर परिवाराचे सातत्यपूर्ण सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या सात वर्षांपासून परिवाराच्या वतीने संघाला हॉकी स्टिक, बॉल, शूज आणि सरावासाठी आवश्यक असलेले इतर क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रामीण भागातील गुणवंत मुलींना आवश्यक साधनसामग्री मिळावी आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी, या उद्देशाने परिवाराकडून मदत केली जात आहे. मुलींमध्ये गुणवत्ता होती. मात्र क्रीडा साहित्याची कमतरता होती. माझं लातूर परिवाराने वेळोवेळी मदत केली. त्यांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळेच आज आम्ही जिल्ह्याचे नाव मोठे करू शकलो, अशी भावना प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
ग्रामीण क्रीडा संस्कृतीला बळ
बिंदगीहाळच्या मुलींनी मिळवलेले हे यश केवळ एका शाळेपुरते मर्यादित नसून, लातूर जिल्ह्यातील ग्रामीण क्रीडा संस्कृतीसाठीही प्रेरणादायी आहे. योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि आवश्यक साहित्याची जोड मिळाल्यास ग्रामीण भागातील खेळाडूही राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, हे या संघाने दाखवून दिले आहे. माझं लातूर परिवाराच्या वतीने विजेत्या संघातील खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेतही या मुली लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास परिवाराने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis