
मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आता तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेता राम पोथिनेनी यांच्या आगामी ‘आरएपीओ२३’ या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी रितेश देशमुखच्या सहभागाची घोषणा केली आहे. सध्या हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. दरम्यान, सेटवरून समोर आलेल्या बिहाइंड द सीन व्हिडिओमध्ये राम पोथिनेनी रितेशचे उत्साहात स्वागत करताना आणि त्याला मिठी मारताना दिसत आहेत. या भेटीमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘आरएपीओ२३’ हा चित्रपट राम पोथिनेनी यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचा आहे. या चित्रपटातून ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. कृष्णा पोथिनेनी यांच्या रापो सिनेमॅटिक्स या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट नियो-नोयर शैलीतील कथानकावर आधारित आहे. रितेश देशमुखने यापूर्वी ‘एक व्हिलन’, ‘रेड २’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून तो दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत नवी सुरुवात करणार आहे. चित्रपटातील त्याची भूमिका कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटात संयुक्ता मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये सिनेमॅटोग्राफर थिरुनावुकरासू, ज्यांना तिर्रू या नावानेही ओळखले जाते, प्रॉडक्शन डिझायनर ए. एस. प्रकाश आणि संगीतकार सॅम सी. एस. यांचा समावेश आहे. तर अॅक्शन दृश्यांची जबाबदारी पीटर हेन, विक्रम मोर आणि केविन सांभाळत आहेत. सध्या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. राम पोथिनेनी यांचे दिग्दर्शनातील पदार्पण आणि रितेश देशमुखचे तेलुगू चित्रपटसृष्टीतील पदार्पण यामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule