
मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. वैद्यकीय व्यवस्थेला आव्हान देत न्याय मिळवण्यासाठी ते संघर्ष करताना दिसतील. एम. पद्मकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट व्यवस्थेतील त्रुटी आणि सत्याच्या शोधाची कथा मांडतो. या चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा आपल्या दमदार आणि आक्रमक अंदाजात दिसत आहेत. ‘सूर्या’ हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टीझरची सुरुवात सनी देओल यांच्या संवादाने होते. यात ते डॉक्टरांवर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णाची परिस्थिती आणि विश्वासघाताचा प्रश्न उपस्थित करतात. वैद्यकीय व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीभोवती चित्रपटाची कथा फिरते. या लढ्यादरम्यान त्याला स्वतःच्या भूतकाळाशी आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक भावनिक प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. टीझरमध्ये चित्रपटातील अॅक्शनसोबतच गंभीर विषयाची झलकही पाहायला मिळते.
दीपक मुकुट, हेमंत मुकुट आणि लोकेश मुकुट यांनी निर्मिती केलेल्या ‘सूर्या’ या चित्रपटात सनी देओल यांच्यासोबत प्रज्ञा जैस्वाल, रवी किशन आणि टीनू आनंद हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. वैद्यकीय व्यवस्था, विश्वास आणि न्याय या मुद्द्यांभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule