
मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेत्री यामी गौतम धरच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडमध्ये जगभरात १६.२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.६० कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी त्याची कमाई वाढून ५.७० कोटी रुपयांवर पोहोचली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने जगभरात ५.९६ कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केला. अशा प्रकारे चित्रपटाने तीन दिवसांत एकूण १६.२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘नई नवेली’ या चित्रपटात रामायणाशी संबंधित कल्पना आणि एका अनोख्या कुटुंबाची कथा देशी फँटसीच्या शैलीत सादर करण्यात आली आहे. अवस्थी कुटुंबाच्या कथेच्या माध्यमातून विनोद, भावना आणि कौटुंबिक नातेसंबंध दाखवण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबासोबत चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना लक्षात घेऊन हा चित्रपट मनोरंजनाने भरलेला सिनेमॅटिक अनुभव म्हणून सादर करण्यात आला आहे. पहिल्या वीकेंडमधील कामगिरी पाहता, आगामी दिवसांतही चित्रपटाची कमाई चांगली होण्याची अपेक्षा आहे.
बालाजी मोहन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची कथा हिमांशू शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात यामी गौतमसोबत आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवार, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुस्मिता मुखर्जी आणि प्रतीक पचौरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आनंद एल. राय आणि हिमांशू शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर संगीत जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि कलर येलो या बॅनरअंतर्गत तयार झालेला ‘नई नवेली’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule