लातूर ग्रामीणमध्ये बेकायदेशीर सुतळी बॉम्ब कारखान्यावर छापा
सहा महिला कामगारांसह मुकादम ताब्यात लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर ग्रामीण परिसरातील ममदापूर येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर सुतळी बॉम्ब निर्मितीच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास
पोलीस कारवाई


सहा महिला कामगारांसह मुकादम ताब्यात

लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर ग्रामीण परिसरातील ममदापूर येथे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर सुतळी बॉम्ब निर्मितीच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले बॉम्ब आणि निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. घटनास्थळी सहा महिला कामगार आणि एक मुकादम उपस्थित असल्याचे आढळून आले.

शेतातील शेडमध्ये सुरू होती निर्मिती

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ममदापूर येथील चंद्रकांत धनवे यांच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. रस्त्यालगत असलेल्या अंदाजे १५ बाय ५० फूट आकाराच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच शेडलगतच्या मोकळ्या जागेत सुतळी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू होते. पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तयार सुतळी बॉम्ब, प्रक्रियेत असलेले बॉम्ब, सुतळी, कागद, गंधक आणि बॉम्ब निर्मितीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली.

कारखान्याच्या मालकाचे नाव समोर

घटनास्थळी लिंबराज गणपती मोरे (वय ४२, रा. ममदापूर, ता. लातूर ग्रामीण) हा मुकादम सहा महिला कामगारांसह उपस्थित होता. प्राथमिक चौकशीत या सुतळी बॉम्ब निर्मितीच्या ठिकाणाचा मालक म्हणून आसिफ रसूल शेख (वय ३२, रा. ताजुद्दिन बाबा दर्गा रोड, आंबेडकर चौक, लातूर) याचे नाव समोर आले आहे. सुतळी बॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक परवान्यांबाबत चौकशी केली असता, संबंधितांकडे परवाना उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आवश्यक परवान्यांची पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव; मोठ्या दुर्घटनेचा धोका

स्फोटक पदार्थ हाताळताना आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था, संरक्षक साधने आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजना प्रथमदर्शनी अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या महिला कामगारांसह परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, जप्त करण्यात येणाऱ्या साहित्याची मोजणी आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. स्फोटक पदार्थ अधिनियम, १८८४, स्फोटक पदार्थ नियम, २००८ तसेच तपासात निष्पन्न होणाऱ्या अन्य लागू कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. या पथकात चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश कुलकर्णी, पोलीस कर्मचारी लक्ष्मण अर्दवाड, गणेश वनामी तसेच महिला पोलीस कर्मचारी पूनम शेटे आणि रूपाली भोसले यांचा समावेश होता.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

परवान्याशिवाय स्फोटक पदार्थ किंवा फटाक्यांची निर्मिती, साठवणूक अथवा हाताळणी होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. अशा धोकादायक आणि बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande