वनहक्क दाव्यांच्या पडताळणीसाठी २००५ मधील उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होणार
अपील व क्षेत्र पडताळणीच्या प्रकरणांना गती; १६ लाख रुपयांची तरतूद नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक अचूक, वस्तुनिष्ठ आणि प्रभावी करण्यासाठी सन २००५ या कालावधीतील उपग्रह छायाचित्रे सामूहिकरीत्
वनहक्क दाव्यांच्या पडताळणीसाठी २००५ मधील उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होणार


अपील व क्षेत्र पडताळणीच्या प्रकरणांना गती; १६ लाख रुपयांची तरतूद

नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या पडताळणीची प्रक्रिया अधिक अचूक, वस्तुनिष्ठ आणि प्रभावी करण्यासाठी सन २००५ या कालावधीतील उपग्रह छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली १६ लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संबंधित कालावधीतील जमिनीची स्थिती, वापर आणि भौगोलिक परिस्थिती यांची पडताळणी करण्यास मदत होणार असून, वनहक्क दाव्यांशी संबंधित अपील प्रकरणे तसेच क्षेत्र पडताळणीच्या कामासाठी त्यांचा उपयोग केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेत संबंधित जमिनीवरील पूर्वीची स्थिती आणि उपलब्ध अभिलेखांच्या आधारे दाव्यांची तपासणी करणे महत्त्वाचे असते. काही प्रकरणांमध्ये जमिनीच्या वापराबाबत, प्रत्यक्ष क्षेत्राबाबत किंवा संबंधित कालावधीतील परिस्थितीबाबत पडताळणी करण्याची आवश्यकता असते. अशा वेळी उपग्रह छायाचित्रे महत्त्वाचा संदर्भ उपलब्ध करून देऊ शकतात. सन २००५ मधील छायाचित्रे उपलब्ध झाल्यानंतर संबंधित दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक माहितीची तुलना करणे आणि प्रकरणांचा अभ्यास करणे अधिक सुलभ होणार आहे.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री श्री. महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून १६ लाख रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. संबंधित उपग्रह छायाचित्रे एमआरसॅटकडून प्राप्त करून घेण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील संबंधित प्रकरणांसाठी ही छायाचित्रे सामूहिकरीत्या उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याने आवश्यक संदर्भ माहिती एकत्रित स्वरूपात मिळण्यास मदत होईल.

वनहक्क दाव्यांशी संबंधित अपील प्रकरणांमध्ये उपलब्ध कागदपत्रे, महसुली अभिलेख, प्रत्यक्ष क्षेत्राची माहिती आणि इतर संबंधित पुराव्यांचा विचार करावा लागतो. उपग्रह छायाचित्रांच्या मदतीने संबंधित क्षेत्राच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करता येऊ शकतो. त्यामुळे दाव्यांची छाननी करताना संबंधित अधिकाऱ्यांना पूरक माहिती उपलब्ध होईल. तसेच क्षेत्र पडताळणीशी संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक संदर्भ तपासण्यास मदत होणार आहे.

छायाचित्रे आणि इतर अभिलेखांच्या एकत्रित अभ्यासातून प्रकरणांची वस्तुनिष्ठ तपासणी करण्यास मदत होईल. परिणामी, संबंधित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या कामकाजात तांत्रिक माहितीचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मंजूर निधीतून उपग्रह छायाचित्रे उपलब्ध करून घेतल्यानंतर त्यांचा वापर संबंधित दाव्यांची पडताळणी, अपील प्रकरणांचा अभ्यास आणि क्षेत्रविषयक माहितीची तपासणी यासाठी करण्यात येणार असल्याचेही जिव्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande