सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी- महेबूब शेख
बीड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। दुष्काळाने आष्टी तालुक्यातील शेतकरी अक्षरशः होरपळून निघाला आहे. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पशुधनाच्या चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही,तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्
आंदोलन


बीड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।

दुष्काळाने आष्टी तालुक्यातील शेतकरी अक्षरशः होरपळून निघाला आहे. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून पशुधनाच्या चारा- पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही,तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांना झेपत नाही. अशा नाजूक परिस्थितीत सरकारने केवळ घोषणा करून आणि तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून ठोस मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केली.

धामणगाव येथे आयोजित शेतकरी आक्रोश रास्ता रोको आंदोलनात बोलताना महेबूब शेख, म्हणाले की, सरकारने आष्टी, पाटोदा, शिरूरसह २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र दुष्काळ जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष आणि भरीव मदत जमा होणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत, शेतमजुरांना पंचवीस हजारांची आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक फी माफी तसेच हॉस्टेल आणि मेसचा खर्च शासनाने करावा. पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान द्यावे तसेच चारा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पशुधन वाचवण्यासाठी शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेती, पिके, पशुधन, विहिरी, घरे आणि दुकानांचे झालेले नुकसान याची प्रलंबित भरपाई तातडीने द्यावी. “शेतकरी सरकारकडे भीक मागत नाही; आपल्या हक्काची मदत मागत आहे. शेतकऱ्यांच्या घामाची किंमत सरकारने द्यायलाच हवी. केवळ कागदावरील घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष मदत जमा झाली पाहिजे” असे महेबूब शेख यांनी स्पष्ट केले.

सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही, तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, तालुकाध्यक्ष सुनील नाथ, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी,प्रदेश युवक सचिव रिजवान शेख, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राहुल काकडे, संजय थोरवे, जगन्नाथ ढोबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदरिल शेतकरी आक्रोश रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन युवक तालुकाध्यक्ष विजय गाढवे यांनी केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande